धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा , जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

Spread the love




धाराशिव येथील प्रस्तावित केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेतील सर्वात मोठा अडसर ठरलेला जागेचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. त्यामुळे केंद्रीय विद्यालय सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेचे केव्हीएस पथक सोमवारी प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी धाराशिव येथे येणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार सीबीएसई शिक्षणाची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे सातत्याने आपण याबाबत पाठपुरावा करीत होतो. केंद्रीय विद्यालयासाठी आवश्यक अटी पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधला गेला. त्यानंतर विद्यालयासाठी तात्पुरती तसेच कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. याशिवाय, भविष्यात केंद्रीय विद्यालयाचा कायमस्वरूपी सुसज्ज आणि अद्ययावत परिसर उभारण्यासाठी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या निवासी वसाहतीमागील सुमारे पाच एकर शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही झाला आहे. संबंधित प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्रीय विद्यालय संघटनेकडे पाठविण्यात आला आहे. त्या जागेचीही पाहणी करण्यासाठी केव्हीएसचे पथक सोमवारी धाराशिवला येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. उपलब्ध असलेली जमीन, तात्पुरती इमारत आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांची केंद्रीय विद्यालय संघटनेकडून तपासणी करून तसा प्रस्ताव केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे अंतिम मंजुरीसाठी दाखल केला जाणार आहे. मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर विद्यालय सुरू करण्याचा आदेश जारी केला जाईल. केंद्रीय विद्यालय सुरू झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे पर्व सुरू होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील सीबीएसई अभ्यासक्रम, आधुनिक शिक्षणपद्धती, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक शिक्षण, क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रमांचा लाभ स्थानिक विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच JEE, NEET, NDA, CUET यांसारख्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे. केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचारी, संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणात सातत्य राहील तसेच
आधुनिक प्रयोगशाळा, संगणक शिक्षण, क्रीडा व सहशैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील. पुणे, सोलापूर, लातूरसारख्या शहरांत शिक्षणासाठी स्थलांतराची गरज कमी होऊन पालकांचा आर्थिक भारही हलका होईल आणि
धाराशिवच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषद देणार तात्पुरती जागा : आमदार राणाजगजितसिंह पाटील

केंद्रीय विद्यालयासाठी तात्पुरत्या स्वरूपात डीआयसी रोडवरील प्रशस्त जागा आणि सुसज्ज इमारत उपल्ब्ध करून देण्याचा ठराव नवीन जिल्हा परिषदेच्या सभागृहाने यापूर्वीच मंजूर केला आहे.डाएट इमारतीसमोरील जिल्हा परिषदेच्या प्रशालेतील प्रशस्त २५ वर्गखोल्या, सुसज्ज ग्रंथालय, एक मोठे सभागृह, वाहनतळ आणि तीन एकर जागा केंद्रीय विद्यालयास उपल्ब्ध करून दिली जाणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!