धाराशिव प्रतिनिधी : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणे विक्री केंद्रातून बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र संबंधित बियाण्यांची अपेक्षित उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडे बियाण्यांच्या पिशव्या तसेच खरेदीच्या पावत्या उपलब्ध असल्याचेही राष्ट्रवादी कॉंग्रेस (श प) पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित बियाण्यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी, शेतांमध्ये पंचनामे करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि बाधित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस (श प) पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बियाण्यांच्या गुणवत्तेची कठोर तपासणी करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.