आरोग्यसेवेचा दिलासा… आता भूममध्येच! तेरणा जनसेवा केंद्राचे उद्घाटन; गरजू रुग्णांना स्थानिक पातळीवर सुविधा
भूम | प्रतिनिधी
सामान्य नागरिकांना वेळेवर, दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने भूम येथे तेरणा जनसेवा केंद्राचा शुभारंभ ११ जुलै रोजी युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
तेरणा हॉस्पिटल, नेरुळ (नवी मुंबई) येथे धाराशिव जिल्ह्यातील हजारो गरजू रुग्णांवर अत्याधुनिक व पूर्णपणे मोफत उपचार करण्यात येत असून, अनेक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेत नवजीवन मिळवले आहे. मात्र, प्राथमिक तपासणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि इतर प्रक्रियेसाठी धाराशिव येथे जावे लागत असल्याने रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
ही अडचण लक्षात घेऊन भूम येथे तेरणा जनसेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना प्राथमिक तपासणी, आवश्यक मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता तसेच तेरणा हॉस्पिटलशी थेट समन्वयाची सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रुग्णांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. गरजूंसाठी हे केंद्र आरोग्यसेवेचा आधार आणि जनसेवेचे विश्वासार्ह व्यासपीठ ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सभापती विश्वास कोकणे, बाळासाहेब क्षीरसागर, संतोष सुपेकर, महादेव वडेकर, अंगद मुरूमकर, प्रदीप साठे, स्वातीताई तनपुरे, बाबासाहेब वीर, शंकर खामकर, बिभीषण पवार, सिद्धार्थ जाधव, सुदाम पाटील, सुभाष पांढरे, सुहास सानप, ज्ञानेश्वर सानप, सुब्राव शिंदे, अमोल डोबाळे, गणेश भोगील, अशोक महानवर, पवन वणवे, रोहिदास भोसले, सुरेश उपरे, निलेश शेळके, बन्सी काळे, बालाजी भोरे, संजय जगदाळे, हनुमंत शेलार, प्रभाकर डोबाळे, अशोक पाटील, रंजित वारे, सुहास चव्हाण, काकासाहेब चव्हाण यांच्यासह तेरणा जनसेवा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच भूम परिसरातील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मल्हार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, “गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आमच्या जनसेवेचे खरे बळ असून, सर्वसामान्यांना आरोग्यसेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी असे उपक्रम अधिक व्यापक करण्यात येतील.”