जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न पन्नास टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट त्यासाठी राज्यातील पहिले ‘फ्लॅगशिप प्रकल्प मॉनिटरिंग’ मॉड्युल मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
धाराशिव:
आगामी काळात धाराशिव जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न पन्नास टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विकासकामांना निर्धारित वेळेत अधिक गती देण्यासाठी राज्यातील पहिले ‘फ्लॅगशिप प्रकल्प मॉनिटरिंग’ मॉड्युल तयार करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, पर्यटन व्यवसाय यासोबतच पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी या महत्वाच्या ४५ प्रकल्पांवर आपण लक्ष केंद्रित केले आहे. त्यातून जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न आज आहे त्यापेक्षा पन्नास टक्क्यांनी वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी एका अनोख्या आणि प्रभावी प्रणालीच्या अंतर्गत ४५ प्रकल्पावर नोडल अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली काम सुरू आहे. या ४५ प्रकल्पांचे निर्धारित वेळेत काम पूर्ण व्हावे याकरिता ७२ भाग करण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीदरम्यान शासन निर्णय, निधी मंजुरी, जमीन अधिग्रहण, प्रशासकीय मान्यता किंवा इतर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्या कोणत्या स्तरावर प्रलंबित आहेत, याचे विश्लेषण करून त्या तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक समन्वयही साधला जातो. ज्या अडचणी नोडल अधिकाऱ्यांच्या स्तरावर मार्गी लागत नाहीत, त्या जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पुढे पाठपुरावा करून निकाली काढल्या जातात. आवश्यकतेनुसार विभागीय आयुक्त स्तरावरही पाठपुरावा केला जातो. मंत्रालयीन स्तरावरील प्रलंबित बाबी मार्गी लावण्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. श्रीकर परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते विविध विभागांशी समन्वय साधून मंजुरी प्रक्रिया गतीमान करण्यासाठी सहकार्य करत असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेवर पालक सचिव सातत्याने देखरेख ठेवत असून, वेळोवेळी आढावा बैठका घेऊन महत्त्वाच्या विषयांना गती देत आहेत. तसेच आपण स्वतः नियमित बैठका घेऊन प्रत्येक प्रकल्पाचा आढावा घेत आहेत. अडचणीच्या ठिकाणी स्वतः पाठपुरावा करत असून, विषयनिहाय स्वीय सहायकांची नियुक्ती करून विविध प्रकल्पांच्या प्रगतीवर स्वतंत्रपणे लक्ष ठेवण्यात येत आहे.
प्रकल्प व्यवस्थापन अधिक प्रभावी, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी आसना या जागतिक स्तरावर वापरल्या जाणाऱ्या प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअरचा अवलंब करण्यात आला आहे. अनेक नामांकित कंपन्या तसेच मित्र संस्थेद्वारेही या सॉफ्टवेअरचा सध्या वापर केला जात आहे. जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, अनेक अधिकारी सध्या या प्रणालीद्वारे प्रकल्पांचे मॉनिटरिंग करत आहेत. यामुळे प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रलंबित बाबी, जबाबदाऱ्या आणि पाठपुराव्याची माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होत असून, निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान, अचूक आणि परिणामकारक होणार असून या अभिनव मॉड्युलमुळे जिल्ह्यातील महत्त्वाच्या विकासकामांना निश्चितच गती मिळेल आणि धाराशिवच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकल्पांवर विशेष लक्ष : आमदार राणाजगजितसिंह पाटील
तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा, मंदिर विकास, जमीन अधिग्रहण, १०८ फूट मूर्ती, भक्त सुविधा केंद्र, रामदरा तलाव सुशोभीकरण यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ५०० खाटांचे नवीन शासकीय रुग्णालय, शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असणारा तारा प्रकल्प, धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे प्रकल्प, कृष्णा–मराठवाडा सिंचन प्रकल्प, माळुब्रा येथील विमानतळ धावपट्टी विकास, कौडगाव रोजगार निर्मिती प्रकल्प, नळदुर्ग–होर्टी MIDC साठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया यासह जिल्ह्यातील इतर विविध पायाभूत सुविधा, सिंचन, आरोग्य, उद्योग व पर्यटन विकासाशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांवर सध्या विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विकासकामांचा वेग वाढविण्यासाठी, विविध विभागांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्यासाठी आणि प्रत्येक महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आलेले “फ्लॅगशिप प्रकल्प मॉनिटरिंग – धाराशिव जिल्हा पॅटर्न” हे मॉड्युल राज्यासाठी एक आदर्श ठरेल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला जात आहे.