परळी येथील मयत तोहीद खान हत्याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व पीडित कुटुंबाला न्याय मिळावा – सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र

Spread the love


कळंब, दि. ६ जुलै : परळी येथील मयत तोहीद खान यांच्या निर्घृण हत्याप्रकरणी पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, या मागण्यांसाठी सकल मुस्लिम युवक महाराष्ट्रच्या वतीने महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री यांच्या नावे उपविभागीय अधिकारी कार्यालय, कळंब, जिल्हा धाराशिव येथे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनामध्ये प्रकरणातील प्रत्येक आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देणे, व्हायरल ऑडिओ क्लिपची न्यायवैद्यकीय तपासणी करणे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असल्यास त्याचीही चौकशी करणे, पीडित कुटुंबाला किमान ₹१० लाखांची आर्थिक मदत जाहीर करणे, कुटुंबातील एका पात्र सदस्याला शासकीय नोकरी देणे तसेच शासनामार्फत सक्षम विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सकल मुस्लिम युवक महाराष्ट्रचे धाराशिव जिल्हाध्यक्ष इम्रान नजमोद्दीन मुल्ला, कळंब शहराध्यक्ष अमन शेख, ज्येष्ठ नागरिक महादेव महाराज अडसूळ, ज्येष्ठ पत्रकार महादेवसिंग राजपूत, संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक अतुल गायकवाड, संभाजी ब्रिगेड तालुका उपप्रमुख जावेद सौदागर, अॅड. शिवराज मराठे, विलास गुंडाळ, समीर सय्यद, इमरान काझी, वाजेद तांबोळी, मोहम्मद सय्यद तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी सकल मुस्लिम युवक महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष इम्रान नजमोद्दीन मुल्ला यांनी सांगितले की, “हा लढा कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून न्याय, संविधान आणि कायद्याच्या राज्यासाठी आहे. मयत तोहीद खान यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आमचा लोकशाही मार्गाने सुरू असलेला संघर्ष कायम राहील.”


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!