धाराशिव, दि. 01 एप्रिल 2026 :
धाराशिव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करत माध्यमिक शिक्षण विभागातील वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधीक्षकाला ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणातील आरोपी पठाण इम्रानखान अहमदपाशा (वय 40) हे वेतन व भविष्य निर्वाह निधी, माध्यमिक शिक्षण विभाग, धाराशिव येथे अधीक्षक (वर्ग 2) पदावर कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या सन 2016 ते 2024 या कालावधीतील वरिष्ठ वेतन श्रेणीचा सुमारे 1 लाख 84 हजार 600 रुपयांचा फरक काढून देण्यासाठी आरोपीने सुरुवातीला 10 हजार रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव येथे तक्रार दिली. त्यानुसार पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपीने तडजोड करत 8 हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर 1 एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. सेंट्रल बिल्डिंग येथील कार्यालयात आरोपीने आपल्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून पंचासमक्ष 8 हजार रुपयांची लाच स्वीकारताच ACB पथकाने त्याला तात्काळ ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान आरोपीकडून टायटन कंपनीचे मनगटी घड्याळ, सॅमसंग कंपनीचे एअरबड्स, 930 रुपये रोख रक्कम तसेच अंदाजे 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपीचा मोबाईल पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आला असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाणे, धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय वगरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागितल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 9270231064 वर संपर्क साधावा.