धाराशिव :
धाराशिव तालुक्यातील पिंपरी येथे दि. 27 रोजी रात्री आमदार कैलास पाटील यांनी नागरिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या अडचणी व स्थानिकांच्या मागण्या जाणून घेतल्या.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातचे उभे पीक पाण्यात वाहून गेले असून, घाम गाळून उभं केलेलं आयुष्याचं सोने चिखलाखाली गाडलं गेलं आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
“राज्य सरकार मात्र ठोस निर्णय घेण्याऐवजी पंचनाम्यांच्या घोषणांवरच समाधानी असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी कितीही गर्विष्ठ असले तरी जनमताच्या रेट्यापुढे त्यांना झुकावेच लागते,” अशी टीका आ. कैलास पाटील यांनी केली.
तसेच, राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची सरसकट भरपाई आणि कर्जमाफी द्यावी, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.