लातूर (प्रतिनिधी) – मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्याला थेट मुंबईशी जोडणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार असल्याची चर्चा सध्या जिल्हाभर वेगाने सुरू आहे.
स्थानिक माध्यमांनुसार, या गाडीचा प्रस्तावित मार्ग लातूर–धाराशिव–कुर्डुवाडी–दौंड–पुणे–कल्याण–ठाणे–मुंबई (CSMT) असा असू शकतो.
सध्या मुंबई–लातूर प्रवासाला ९ ते १० तास लागतात. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यास हा प्रवास ३ ते ४ तासांनी कमी होऊन सुमारे ७ तासांत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
व्यापार, शिक्षण आणि धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने ही सुविधा जिल्ह्यासाठी मोठा लाभदायी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, लातूर–मुंबई वंदे भारत गाडीबाबत अद्याप रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.
मात्र, लातूर जिल्ह्याचे नाव देशाच्या रेल्वे नकाशावर अधोरेखित करणारी एक महत्त्वाची घोषणा तेव्हाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी 2023 साली संसदेत केली होती.
त्यांनी सांगितले होते की, लातूर रेल कोच फॅक्टरीतून तब्बल १२० वंदे भारत गाड्यांचे उत्पादन होणार असून, २०२६ पर्यंत वंदे भारत स्लीपर प्रकारच्या गाड्याही मार्गावर उतरणार आहेत.
सध्या रेल्वे मंत्री पदावर अश्विनी वैष्णव कार्यरत असून, त्यांच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणावर वंदे भारत गाड्यांचे जाळे विस्तारत आहे.
म्हणजेच, लातूरकरांसोबतच धाराशिवकरांमध्येही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
गाडी सुरू होण्याची घोषणा अद्याप शासकीय स्तरावर झालेली नसली, तरी प्रवास वेळेची बचत, आधुनिक सोयी व रोजगाराच्या संधी यामुळे या दोन्ही जिल्ह्यांत आनंद व उत्साहाचे वातावरण आहे.