धाराशिव :
विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणात शांत असलेले माजी आरोग्यमंत्री व भूम–परंडा–वाशी मतदारसंघाचे आमदार डॉ. तानाजी सावंत पुन्हा सक्रिय होण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल दोन तासांची बैठक झाल्याची माहिती स्वतः डॉ. सावंत यांनी फेसबुकवरून शेअर केली आहे.
फेसबुक पोस्टमध्ये डॉ. सावंत यांनी लिहिले आहे की, “शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून आज मुंबई येथे तातडीने भेटीचा निरोप आला. या निरोपानिमित्त तात्काळ मुंबईला जाऊन साहेबांची भेट घेतली. साहेबांसोबत तब्बल 2 तास विविध राजकीय घडामोडींवर आणि राज्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.”
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रीपद न मिळाल्याने डॉ. सावंत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. ते सक्रिय राजकारणापासून काही काळ दूर राहिल्याचे देखील बोलले जात होते.
मात्र, आज झालेल्या या भेटीनंतर त्यांच्या पुन्हा राजकीय कमबॅकसह मंत्रीपद मिळण्याच्या शक्यतांना जोर आला आहे. यामुळे जिल्ह्यासह राज्यात नवे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
