धाराशिव :
उमरगा तालुक्याचे विभाजन करून लोहारा हा स्वतंत्र तालुका 27 जून 1999 रोजी अस्तित्वात आला. सध्या लोहारा तालुक्यातील 45 गावांत सुमारे 1 लाख 60 हजार लोकसंख्या असून 1 लाख 10 हजार मतदार आहेत. तालुका निर्मितीनंतर अनेक प्रशासकीय कार्यालये येथे आली असली तरी दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा तालुका अजूनही अपुऱ्या सुविधा भोगत आहे.
जीवनराव गोरे एसटी महामंडळाचे अध्यक्ष असताना तब्बल 85 लाख रुपयांचा निधी वापरून बसस्थानक उभारण्यात आले होते. मात्र हे स्थानक अपुरे ठरत असून प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत.
लोहारा तालुका हा तुळजापूर व अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांना जोडणारा दुवा असून लातूरसारख्या मोठ्या बाजारपेठेशी व्यापार, शिक्षण व उद्योगासाठी सातत्याने मोठी वर्दळ असते. महिलांसह अनेक प्रवासी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लोहाऱ्यातून प्रवास करतात. मात्र प्रवाशांना अद्याप योग्य सुविधा मिळत नसल्याने त्यांची कुचंबना होत आहे.
सध्या लोहाऱ्यात बसस्थानक असले तरी बस डेपो नाही. त्यामुळे स्थानिक प्रवासी इतर डिपोंवर अवलंबून आहेत. लोहाऱ्यात प्रशस्त चार एकर जागा उपलब्ध असून येथे किमान 50 बसांची सोय असलेला डेपो उभारणे तातडीचे आहे.
यासंदर्भात लोकसभा युवा अध्यक्ष आनंद पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना धाराशिव दौऱ्यात निवेदन देऊन लोहाऱ्यात लवकरात लवकर बस डेपो उभारण्याची मागणी केली.