धाराशिव, दि. 13 जुलै (अंतरसंवाद न्यूज) – चेन्नई येथून आलेला आणि तामिळ भाषा व्यतिरिक्त कोणतीही भाषा न समजणारा एक बेवारस रुग्ण तब्बल सहा महिने धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत होता. अखेर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आणि समाजसेवकांच्या अथक प्रयत्नातून त्याला त्याच्या कुटुंबासोबत पुन्हा एकत्र आणण्यात यश आले आहे.
दि. 1 जुलै 2025 रोजी संध्याकाळी सामाजिक कार्यकर्त्या आशाताई कांबळे यांनी समाजसेवा अधिक्षक नवनाथ सरवदे यांना संपर्क केला. चेन्नई येथील एका बेवारस रुग्णाला धाराशिवच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाला केवळ तामिळ भाषा येत असल्याने त्याच्याशी संवाद साधणे अवघड झाले होते.
तथापि, नवनाथ सरवदे, महेश अटकळ आणि त्यांच्या टीमने एक व्हिजिटिंग कार्डवरून सुराग काढत रुग्णाच्या कुटुंबाचा शोध घेतला. पुढे तामिळनाडूतील इंटर्नल डॉ. अदिती यांच्या मदतीने संपर्क साधण्यात आला. रुग्णावर दरम्यान डॉ. बालाजी बाराते, डॉ. साहील गांधी, डॉ. बिनसागर पुडीकेल यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू राहिले.
कक्षसेवक दादा माळी व स्टाफ नर्सेसच्या सहकार्याने रुग्णाला अत्यंत माया व जिव्हाळ्याने सेवा देण्यात आली. त्याच्या पुनर्वसनासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे, अॅड. अश्विनी सोनटक्के, प्रा. दिव्या सोनटक्के यांचं मोलाचं योगदान लाभलं.
शेवटी आज, दि. 13 जुलै रोजी रुग्णाचा मुलगा मुथ्थुराम किंगम आणि सून नागलक्ष्मी यांनी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन चेन्नईला परत नेले. रुग्णाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आणि उपस्थित सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.