
तुळजापूर (अंतरसंवाद न्यूज): तुळजापूर येथील शिवसैनिक अमोल जाधव यांची शिवसेना (शिंदे गट) तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे उपनेते व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत पार पडली. यावेळी चौगुले यांनी जाधव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अमोल जाधव हे गेल्या काही काळात तुळजापूर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये सक्रीय राहिले आहेत. तुळजापूर यात्रा मैदानाच्या प्रश्नावर त्यांनी सातत्याने आंदोलने, निवेदने आणि मोर्चांच्या माध्यमातून आवाज उठवला होता. या पाठपुराव्यामुळेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी यात्रा मैदानाची प्रत्यक्ष पाहणी करून लवकरच मैदान उभारले जाण्याचे आश्वासन दिले होते.
तसेच, तालुक्यातील विविध गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना वाचा फोडत त्यांनी जनतेचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या सक्रियतेमुळे नव्या कार्यकर्त्यांचा मोठा गट शिवसेनेत सहभागी झाला असून, त्यांनी एक सशक्त संघटनात्मक फळी निर्माण केली आहे.
पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, पक्षाचे सचिव संजय मोरे आणि धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल जाधव यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात असून, त्यामुळे तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक बळकट होणार आहे.
नियुक्तीनंतर बोलताना अमोल जाधव म्हणाले, “पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिवसेना बळकट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. लवकरच नव्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.”
या नियुक्तीप्रसंगी धाराशिव जिल्हाध्यक्ष मोहन पनुरे, उमरगा तालुकाध्यक्ष बळीराम सुरवसे, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष गणेश नेपते, तुळजापूर शहर उपाध्यक्ष रमेश चिवचिवे, चिम्मुभाई शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्याच्या राजकारणात ही नियुक्ती चर्चेचा विषय बनली असून, अमोल जाधव यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे भविष्यातील कार्य कसे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
—
#अमोलजाधव #शिवसेना #शिंदेगट #तुळजापूर #धाराशिवन्यूज #उस्मानाबादन्यूज #अंतरसंवादन्यूज #धाराशिव #उस्मानाबाद