आरोग्य मंदिरातले पुण्यकर्म..! संदीप काळे

Spread the love

आरोग्य मंदिरातले पुण्यकर्म..!

त्या दिवशी सकाळी आठ वाजता मंत्रालयाच्या दूरध्वनीवरून मला फोन आला. म्हणाले, ‘संदीप सर, अजितदादांच्या उद्याच्या भेटीगाठी रद्द झाल्यात. त्या आज होत आहेत. तुम्हाला आज मंत्रालयात येणे शक्य आहे का?’
मी लगेच होकार दिला. ‘सारथी’ नावाच्या शासनाच्या मोठ्या उपक्रमाने, चार वर्षात बहुजनांच्या साडेचार हजार मुलांचे अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे. ‘सारथी’चे एवढे मोठे यश एका पुस्तकाच्या रूपाने मी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये लिहिले आहे. त्या पुस्तकांच्या प्रकाशनासाठी मला अजितदादा यांची तारीख हवी होती. दादांसारखा प्रचंड शिस्तीत काम करणारा माणूस या राज्याला पुन्हा भेटणे शक्य नाही असे मला वाटते. जसे दादा शिस्तीचे, तसे त्यांची काम करणारी माणसेही. दिवस नाही, रात्र नाही, बस काम एके काम, अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे.

मी मंत्रालयात प्रवेश करणार, इतक्यात मागून एका माणसाने मला आवाज दिला. ‘अहो दादा, मला मुख्यमंत्री वैद्यकीय साह्ययता कक्षात जायचे आहे’.
मी मागे वळून पहिले तर, एक अतिशय वयोवृद्ध व्यक्ती पायात साधी चप्पल, अंगात मळकट कपडे, हातात एक पिशवी. माझ्या लक्षात आले काहीतरी आजाराचे कारण घेऊन हा माणूस मंत्रालयातील आरोग्य कक्षात जात असावा. मी अगदी नम्रपणे त्या व्यक्तीला म्हणालो, ‘काका, तुम्हाला दोन वाजल्याच्या नंतरच मंत्रालयात येता येईल. आत आलात की, सातव्या मजल्यावर या’. त्या व्यक्तीने ‘धन्यवाद’ म्हणत माझ्यासमोर हात जोडले. माझ्या लक्षात आले त्या माणसात कमालीची नम्रता होती.

मी मंत्रालयात गेलो. दादांची भेट झाली. बाकी ज्यांच्या भेटी घ्यायच्या होत्या, त्यांच्याही भेटीगाठी झाल्या. मला एकदम आठवले, आज दत्तात्रय विभुते काका यांचा वाढदिवस आहे. आयुष्यभर रुग्णसेवेला आपले कर्तव्य मानून केवळ लोकांचे आशीर्वाद घेण्याचे काम विभुते काकांनी जेजे रुगालयात केले. आता सेवानिवृत्तीनंतर विभुते काका मुख्यमंत्री वैद्यकीय साहायता कक्षाचे काम पाहतात. काकांना भेटणे, म्हणजे नेहमी एक पर्वणी असते. मी काकांना भेटायला गेलो, तेव्हा तिथे माणसे कमी आणि केक जास्त असे चित्र होते. मी गेलो. काकांना शुभेछा दिल्या. पत्रकार मित्र आणि मुख्यमंत्री वैद्यकीय साहायता कक्षप्रमुख रामेश्वर नाईकही भेटले. मी काकांशी बोलत होतो, तितक्यात समोरच्या बाकावर, मंत्रालयाच्या गेटवर भेटलेला ‘तो’ माणूस मला दिसला. कदाचित त्या माणसाने सकाळपासून पाणीही घेतले नव्हते, म्हणून त्याचे ओठ कोरडे पडले असावेत.

कक्षातील गर्दी कमी झाली की, आपण आतमध्ये येऊन आपले म्हणणे मांडावे, अशी भाबडी आशा त्या माणसाची असेल. त्या बिचाऱ्याला काय माहिती अवघा महाराष्ट्र त्या मुख्यमंत्री वैद्यकीय साहायता कक्षाभोवती फिरतो. मी उठलो. त्या व्यक्तीच्या हाताला धरून मी त्यांना विभुते काकांसमोर आणून बसवले. मी विभुते काकांना म्हणालो, ‘काका, हे गृहस्थ सकाळपासून खाली लाईनीत उभे होते. बघा त्यांचे काय काम आहे ते’. विभूते काका ‘हो’ म्हणाले. काकांनी त्या माणसाला पाणी दिले. खायला दिले.

त्या कक्षात आलेला प्रत्येक माणूस मदत घेण्यासाठी येतो. कोणी रडते, कोणी ‘मदत करा साहेब’ म्हणत कक्षातल्या लोकांचे पाय धरते. ओमप्रकाश शेटे सर यांच्यापासून ह्या कक्षाची पायाभरणी झाली आहे. रुग्णांसाठी कल्पवृक्ष, सर्वसामान्यांचा आधार अशी ह्या कक्षाची होती. पुढे मंगेश चिवटे यांनी त्यात आणखी सुधारणा केली. आता रामेश्वर नाईक यांनी तर या कक्षाला खूप मोठ्या उंचीवर नेले आहे. मंत्रालयातील सात मजल्यांवर एकूण सातशे तेवीस कक्ष आहेत, पण त्यामध्ये हा कक्ष केवळ गरिबांचे अश्रू पुसणारा, निवळ गरिबांचे आशीर्वाद घेण्याचे काम करणारा कक्ष आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून या आरोग्यकक्षाचे रूपांतर ‘आरोग्य सुवर्ण मंदिरात’ झाले आहे. खरे तर, या विभागातून मदत घेणारे खूप आहेत. तशी या विभागाला मदत करणाऱ्यांची खूप गरज आहे. रोज दोन ते अडीच हजार लोकांना दुःखाच्या वेळी थेट मदत करणारा हा आरोग्य कक्ष राज्यात सर्वात महत्त्वाचे काम करतो, हे कुणाच्याच लक्षात येत नसेल का? हा भाबडा प्रश्न बाहेर जमलेल्या लोकांची गर्दी पाहून मला पडला होता.

माझे लक्ष पुन्हा त्या समोर बसलेल्या काकांकडे गेले. काकांचे खाणे झाल्यावर विभुते काका त्या काकांना त्यांच्या हातातील पिशवीकडे बघत म्हणाले, ‘द्या काका, ती फाईल. कोणत्या दवाखान्यात आहे पेशंट? का तुम्हीच आहेत पेशंट?’
समोर बसलेले काका शांतपणे हसले आणि म्हणाले, ‘नाही हो, मी मदत घेण्यासाठी आलो नाही, मदत देण्यासाठी आलो आहे’.
त्या काकांचे ते वाक्य ऐकून मी आणि विभुते काका एकमेकांकडे बघतच राहिलो. आम्ही त्या माणसाच्या दिसण्यावर गेलो होतो.
विभुते काका म्हणाले, ‘मदत करायची म्हणजे काय करायचे?’
ते आलेले काका म्हणाले, ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहायता कक्षाला मला मदत करायची आहे’.

मला वाटले, दहा वीस हजार रुपये मदत करायची असेल. काकांनी त्या पिशवीत हात घातला आणि दोन चेक बाहेर काढले. ते काका विभुते काकांना म्हणाले, ‘हा दहा लाख रुपयांचा चेक मुख्यमंत्री वैद्यकीय साहायता कक्षासाठी आहे’.
त्या काकांनी दहा लाखांचा चेक म्हटल्यावर, आम्ही दोघेही एकदम चकित झालो. आपल्या हातातला दुसरा चेक वर करीत ते काका म्हणाले, ‘हा दुसरा दहा लाखांचा चेक पंतप्रधान रिलीफ फंडाला द्यायचा आहे’.
त्या माणसाचे बोलणे ऐकून विभुते काका, त्या कक्षात असलेले विशाल ठाकरे, श्रीकांत केकान, संतोष उगले हे सारेच चकित होऊन चेक देणाऱ्या काकाकडे पाहत होते. रामेश्वर नाईकसह सगळेच त्या व्यक्तीची आता अधिक खोलात जाऊन विचारपूस करीत होते.

आम्ही ज्या चेक देणाऱ्या काकांशी बोलत होतो, त्यांचे नाव सदानंद विष्णु करंदीकर. राहणारे आचरा ता. मालवण या गावचे. वय वर्ष ८५चे हे काका खाजगी कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या पत्नी वनिता करंदीकर ह्या सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. दोघांनाही मुलंबाळं नाहीत. जोपर्यंत हातपाय चालतात, तोपर्यंत त्या दोघांनी घराचा आधार घेतला, पण जेव्हा म्हातारपण आणि आरोग्य दोन्ही साथ देत नव्हते, तेव्हा काका काकूंनी नेरुळ येथील आनंदाश्रम या वृद्धाश्रमाचा आधार घेतला. दोन वर्षांखाली काकांच्या पत्नी मोठ्या आजारामुळे जात राहिल्या. नेरुळच्या वृद्धाश्रमात काकूंच्या खूप आठवणी होत्या. त्या आठवणींमुळे काकांना खूप त्रास व्हायला लागला. मग काकाने कल्याणच्या डॉ. अभयसिंग यांच्या वृद्धाश्रमात राहण्याचा निर्णय घेतला.

काकूने मारताना काकांना सांगितले होते, ‘गरीबांच्या सेवेसाठी आपण कमावलेला पैसा उपयोगाला आणा’. त्यामुळे मुख्यमंत्रीनिधी आणि पंतप्रधान रिलीफ फंडाला २० लाख रुपये देण्याचा निर्णय काकांनी घेतला होता. आम्ही बोलत होतो. रामेश्वर आले आणि त्या सदानंद काकांना म्हणाले, ‘काका, तुम्ही खूप तळमळीने अगदी आयुष्यभर घाम गाळून कमावलेला पैसा मदतीसाठी देताय. आमची तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही हा चेक कुणाच्यातरी हातून द्या’. काका सहजतेने म्हणाले, ‘हो मला कुणाच्यातरी हाती सुपूर्द करायचा आहेच’. नाईक यांनी काकांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नेऊन उभे केले. काकांनी तो चेक देवेंद्रजी यांच्या हाती दिला. देवेंद्रजी यांनी काकांचे अगदी नम्रपूर्वक आभार मानले. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या कक्षातून बाहेर आलो.

का कुणास ठाऊक त्या दिवशी ‘त्या’ कक्षामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत कमालीची चमक होती. कक्षातील सर्वांनी काकांचा निरोप घेतला.
मी काकांच्या हाताला धरून, त्यांना मंत्रालयाच्या बाहेर सोडत असताना, आमच्या गप्पा सुरू होत्या.
काका म्हणाले, ‘खऱ्याची दुनिया नाही राहिली हो. आम्ही मदत देतो अशा मदतीच्या नावाखाली, अनेकजण पैसा घेतात, पण तो सत्कारणी लागतो की नाही, हे सांगता येत नाही. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रिलीफ फंडाची विश्वासार्हता आजही कायम आहे. माझी बायको मला नेहमी म्हणायची, ‘तुम्ही दानधर्म करा. त्यातूनच सारे काही चांगले होते’.

मी काकांना म्हणालो, ‘काका, मुलंबाळं नाहीत, याचे वाईट वाटते का? जर असते तर वृद्धाश्रमात राहायची वेळ आली नसती?’ काका अगदी शांतपणे म्हणाले, ‘आम्ही मूलबाळ व्हावे, यासाठी खूप प्रयत्न केले, पण तीन वेळा प्रयत्न केल्यावर डॉक्टर म्हणाले, आता बायकोच्या जीवाशी खेळणे बंद करा. मुलंबाळ असण्या-नसण्याने काही फरक पडत नाही हो. उतारवयात थोडा आधार हवा असतो, बाकी काय? मी ज्या वृद्धाआश्रमात राहतो, तिथे अनेकांना चार चार मुले आहेत. त्यातले अनेक जण आईवडील जिवंत आहेत की नाही हे पाहण्यासाठी दोनदोन वर्ष येत नाहीत. काय करावे त्या मुलांचे, सांगा वृध्दाश्रम हा एक परिवार असतो. प्रत्येकाचे एकमेकांशी भावनिक नाते असते. कुणी कुणावर रागवत नाही, कुणी कुणाला दोष देत नाही. स्वार्थी अपेक्षा कुणाकडून नसतात. म्हणून तो परिवार प्रत्येकाला आपला वाटतो. तिथे समदु:खी असणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. दोन दिवस झाले. माझी बहीण प्रभा श्रीराम ही कल्याणला राहते. मी तिच्याकडं डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी आलो होतो. आता उद्या ऑपरेशन आहे. त्यापूर्वी हे सत्कर्म करावे, म्हणून येथे आलो’.

मी काकांना टॅक्सीमध्ये बसवून देत होतो, तेव्हा काका म्हणाले, ‘नको, मला लोकलने जायचे आहे. पैसा घाला आणि वेळसुद्धा घाला. कशासाठी? आपली लोकल बरी. एखाद्या आईसारखी काळजी घेते’.
असे म्हणत काका लोकलच्या दिशेने निघाले. मी दान केले, याचा कुठलाही आविर्भाव नाही, अहंकार नाही, दिखावा नाही. साधेपणा हा माणसाचा मौल्यवान दागिना असतो आणि तो किती शोभून दिसतो, हे त्या काकाला पाहिल्यावर माझ्या लक्षात आले.

मी माझ्या घराच्या दिशेने निघालो. माझ्या मनात विचार येत होता, त्या काकांनी त्यांच्या आयुष्याची कमाई अवघ्या एका दिवसात आनंदाने दान केली होती. त्या माणसाचे मन किती मोठे असेल! आयुष्यभर दिखावा, आणि अहंकार यात बुडलेल्या माणसाला मरण जवळ आल्यावर कळते की, आपला जन्म देण्यासाठी झाला आहे. अहंकार आणि दिखावा हे दोन्ही रोग माझ्यासाठी किती घातक होते, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. घेणाऱ्यापेक्षा देणारा मोठा असतो, हे तुम्ही आम्ही ध्यानात ठेवले पाहिजे. बरोबर ना? तुम्ही ठेवणार ना ध्यानात? – संदीप काळे


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!