धाराशिव (प्रतिनिधी) – शहरात आज दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे संपूर्ण शहरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे, फलक आणि होर्डिंग्स तुटून पडले. शहरातील मुख्य रस्त्यांवरील लहान दुकानदारांनी सावलीसाठी केलेले तात्पुरते छत उडून गेले. काही दुकानांचे साहित्य रस्त्यावर पसरले, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.
विशेषतः जुना बसस्थानक परिसर, शिवाजी चौक, बाजारपेठ आणि स्टेशन रोड परिसरात सर्वाधिक नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले. अनेक बॅनर व जाहिरात फलक वाऱ्याच्या जोरामुळे रस्त्यावर आले. काही ठिकाणी वीज खांबही वाकले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
शहरातील नागरिकांना अचानक आलेल्या वादळामुळे त्रास सहन करावा लागला. अद्याप कोणतीही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचा अंदाज आहे.