जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांनी सकारात्मक कल्पना मांडाव्यात – आमदार राणाजगजीतसिंह पाटील

Spread the love

 

धाराशिव,दि.३० ( प्रतिनिधी ) जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी अधिकाऱ्यांनी केवळ नियमित कामकाजापुरते मर्यादित न राहता सकारात्मक दृष्टिकोनातून नवकल्पना मांडाव्यात,असे निर्देश मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिले.

           आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सभेला अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,उपजिल्हाधिकारी सर्वश्री शिरीष यादव,संतोष राऊत,अरुणा गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,जिल्हा रोजगार व कौशल्य विकास उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त संजय गुरव,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.थोरात, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.नाईक,सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला,शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी बालाजी येरमूडवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ.शैलेश चव्हाण,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील,क्रीडा अधिकारी नाईकवाडी,जिल्हा अग्रणी बँक अधिकारी चिन्मय दास,तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे,एमएसईबीच्या कार्यकारी अभियंता निलांबरी कुलकर्णी, महसूलचे तहसीलदार अभिजीत जगताप, पर्यटन विभागाचे उपअभियंता, एमआयडीसीचे परिक्षेत्र अधिकारी यांची उपस्थिती होती.

आमदार पाटील यांनी अलीकडेच सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे महामार्ग,तामलवाडी औद्योगिक वसाहत, आणि विविध क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा घेतला.या बैठकीत त्यांनी जिल्ह्याच्या औद्योगिक,वैद्यकीय, धार्मिक,पर्यटन,रोजगार,सिंचन आणि क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी एक व्यापक काम करून त्यामध्ये नवकल्पना मांडाव्यात अशा सूचना दिल्या.तामलवाडी औद्योगिक वसाहतीत सुमारे दीडशेहून अधिक मध्यम व लघुउद्योग उभारण्याचा मानस असून,यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.याशिवाय फोर्टी येथे अर्धिक वसाहत उभारून रोजगाराच्या संधी वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.शिराढोण (ता. कळंब) येथे नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होणार असून,वैद्यकीय शिक्षणासाठीही जिल्ह्याला नवीन दिशा मिळणार आहे.

 श्री क्षेत्र येरमाळा येथे धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विशेष विकास आराखडा राबवून ते केंद्र उभारण्याची योजना आहे.तसेच पर्यटन विभागाला त्यांनी येरमाळा येथे प्राथमिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीनेही काम करावे,असे निर्देश दिले.येडशी येथील रामलिंग तीर्थक्षेत्र व अभयारण्याचा विकास करून त्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर स्थान देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तुळजापूर येथील शक्तिपीठाच्या माध्यमातूनही धार्मिक पर्यटनास चालना देण्यात येईल.

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प,मांजरा व तेरणा नदीवर बॅरेज बांधणे,निम्न तेरणा प्रकल्प आणि सुरत-चेन्नई महामार्ग यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन त्याची अंमलबजावणी जलदगतीने करण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे शेतीसाठी शाश्वत सिंचनाची सोय निर्माण होणार आहे.प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना व इतर शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.तसेच या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात १०० ड्रोनचे ऑपरेटर तयार करणे त्यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध होते का याबाबत अधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.धाराशिव जिल्ह्यात क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात येणार असून,आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक तंत्रसज्जता आणि केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे.

या बैठकीस जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना फक्त पारंपरिक पद्धतीने काम न करता नव्या दृष्टिकोनातून विचार करून जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.जिल्ह्याच्या आर्थिक,सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी हा आराखडा मैलाचा दगड ठरेल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!