प्रतिनिधी | दत्ता भराटे | वाशी, ता. ३० मे
वाशी तालुक्यातील पारा परिसरात झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे कांद्याचे उभे पीक तसेच आधी काढून साठवलेले कांद्याचे ढिगारेही पाण्याखाली गेले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणीचे संकट निर्माण झाले आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसार आज पंचनाम्यांना सुरुवात झाली असून, पारा येथील तलाठी सज्जा संदीप मोरे, कृषी सहाय्यक हंडीबाग स, तसेच ग्रामसेवक आझाद शेख यांनी सकाळी चिखलातून शेतांमध्ये जाऊन बबलू सखाराम घरत यांच्या शेतातील नुकसानीचा पंचनामा केला.
स्थानिक शेतकरी वर्गामध्ये शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. “सततचा पाऊस आणि उशिरा होणारी मदत या दुहेरी संकटाने आम्ही फार अडचणीत आहोत. नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून मदतीचे वाटप करावे,” अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
स्थानिक प्रशासनाकडून या प्रक्रियेला गती देण्याचे प्रयत्न सुरू असून, पारा आणि आसपासच्या गावांमध्येही नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.