अर्धवट काम झालेल्या बस स्थानकाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक करणार उद्घाटन , उद्घाटनासाठी काम पूर्ण करण्याची गडबड, गुणवत्ता ढासळणार?

Spread the love

धाराशिव | प्रतिनिधी

धाराशिव शहरात साकारण्यात येत असलेल्या नव्या बस स्थानकाचं उद्घाटन अजून काही दिवसांवर येऊन ठेपलं असतानाच, काम अपूर्ण असूनही उद्घाटनाची तयारी जोमात सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते 1 में रोजी 2025 रोजी दुपारी 1 वाजता उद्घाटन होणार आहे असे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्यामध्ये दर्शविण्यात आले आहे. मात्र, फक्त उद्घाटनाच्या ‘ग्लॅमर’साठी उरकली जाणारी कामं गुणवत्तेच्या कसोटीवर अपुरी पडत असल्याची चर्चा सध्या शहरात जोमात आहे.

स्थानकाची मुख्य इमारत पूर्ण झाली असली तरी, केवळ रंगरंगोटी आणि वरवरची देखभाल करून उद्घाटनासाठी सजवली जात असल्याचं चित्र आहे. स्थानकाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचं काम अजूनही रखडलेलं असून, केवळ समोरचा रस्ता युद्धपातळीवर पूर्ण केला जातो आहे – तोही केवळ फोटो आणि कॅमेऱ्यांसाठी! एका साईटचे रस्त्याचे काम करण्यासाठी एक गेट बंद करून तब्बल वीस दिवस झाले तरी रस्ता झाला नाही तर उद्घाटनासाठी मुख्य प्रवेशद्वारा समोरचा रस्ता करण्याचा घाट घालण्यात आला आहे.

“हे उद्घाटन आहे की दिखावा?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. “बस स्थानक म्हणजे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा भाग आहे. तात्पुरत्या देखभालीवर लाखो रुपये खर्च करून जर उद्घाटनचं नाटक करायचं असेल, तर खऱ्या सुविधांचं काय?” असा सवाल स्थानिक व्यापारी संघटनांनीही उपस्थित केला आहे.

कामाची घाई केल्यामुळे गुणवत्तेवर थेट परिणाम होणार हे स्पष्ट आहे. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्याचे आरोपही होत आहेत. सार्वजनिक पैशाचा असा वापर म्हणजे जनतेच्या विश्वासाला तडा देण्यासारखं आहे, असं सामाजिक कार्यकर्ते म्हणत आहेत.

या प्रकरणावर स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसली, तरी मंत्र्यांच्या कार्यालयात उद्घाटनाच्या तयारीसाठी हालचाली वेगात सुरू आहेत. “प्रकल्प पूर्ण झाला की उद्घाटन करावं, अधुरं काम दाखवून जनतेला गाफील ठेवू नये,” अशी मागणी आता जनतेकडून जोर धरू लागली आहे.

उद्घाटनाचा जल्लोष महत्त्वाचा, पण त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे नागरिकांसाठी स्थायिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा निर्माण करणं. फक्त फीत कापण्यासाठी केलेली धावपळ अखेर शहरवासीयांच्या स्वप्नांवर पाणी फेरणार का? याचं उत्तर प्रशासन आणि राजकारण्यांना द्यावंच लागेल.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!