सर्व वकिलांसाठी १० लाखांचे अपघाती विमा कवच; महिला वकिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्थेचा संकल्प
धाराशिव, दि. २१ (प्रतिनिधी) – “धाराशिव जिल्ह्यातील वकिल व नागरिकांना न्यायासाठी सोलापूर व लातूरच्या न्यायालयांत धाव घ्यावी लागते, ही परिस्थिती बदलणार आहे. जिल्ह्यात लेबर, सहकार व कामगार न्यायालये स्थापन करण्यासाठी मी माझ्या अध्यक्षीय कार्यकाळात शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करणार आहे,” अशी ठाम भूमिका नूतन जिल्हा विधीज्ञ मंडळ अध्यक्ष ॲड. अमोल वरुडकर यांनी मांडली.
वकिली व्यवसायातील आपल्या प्रवासाबाबत बोलताना त्यांनी २००८ मधील यादव खूनप्रकरणातील अनुभव शेअर केला. “सतारा, पुणे येथील ज्येष्ठ विधीज्ञांसोबत मी त्या प्रकरणात काम करत होतो. तीन वर्षे चाललेल्या खटल्याचा निकाल २०११ मध्ये लागला आणि त्याने माझ्या करिअरला कलाटणी दिली,” असे ते म्हणाले.
न्यायासाठी झटणारा चेहरा
अनेक वेळा आर्थिक दुर्बल व्यक्तींना मोफत कायदेशीर सेवा दिल्याचे उदाहरण देत ॲड. वरुडकर म्हणाले, “माझे ध्येय न्याय मिळवून देणे हेच असून, पैसे नसल्याने कोणी न्यायापासून वंचित राहू नये, यासाठी मी सतत प्रयत्नशील असतो.”
वकिलांसाठी कल्याणकारी उपाययोजना
सर्व वकिलांना १० लाख रुपयांचे अपघाती विमा सुरक्षा कवच देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. तसेच महिला वकील आणि नोटरी वकिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘नोकरीच्या मागे न लागता, न्यायासाठी झगा’
वडील पंचायत समितीत कारकून असूनही वकिली व्यवसायात प्रवेश करून स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या ॲड. वरुडकर यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. “घरी वकिलीची पार्श्वभूमी नसतानाही मी हा मार्ग निवडला. वकिली हे केवळ करिअर नाही तर सामाजिक न्यायासाठीचे एक शस्त्र आहे,” अशी त्यांची भूमिका आहे.