धाराशिव : धाराशिव तालुक्यातील शिंगाळी येथील विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा शिक्षक सुधीर कांबळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संजीवकुमार मस्के उपस्थित होते. या दोघांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
कार्यक्रमात अध्यक्ष सुधीर कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर भाष्य करताना, “त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनले,” असे सांगितले. त्यांनी डॉ. बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा”, “शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे”, यांसारख्या विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकप्रेमाचा उल्लेख करताना एक प्रसंग सांगितला गेला की, परदेशातून परतताना बाबासाहेब एका जहाजात तर त्यांची पुस्तके दुसऱ्या जहाजात होती. एक जहाज बुडाल्याचे समजल्यावर कुटुंबीय दुःखी झाले, मात्र बाबासाहेब घरी सुखरूप परतले. पण जेव्हा त्यांना त्यांच्या पुस्तकांनी भरलेले जहाज बुडाल्याचे समजले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांच्या पुस्तकांवरील, वडीलांवरील आणि गुरूंवरील प्रेम यावर प्रकाश टाकण्यात आला.
प्रमुख पाहुणे संजीवकुमार मस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपले गाव, जिल्हा व देश प्रगत करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.”
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यांसह विद्यानिकेतन आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब चव्हाण, नागनाथ पाटील, सूर्यकांत बडदापुरे, चंद्रकांत जाधव, खंडू पडवळ, दिपक खबोले, प्रशांत राठोड, कैलास शानिमे, मल्लीनाथ कोणदे, सचिन राठोड, मदनकुमार आमदापुरे, श्रीमती वैशाली शितोळे, सुरेखा कांबळे, श्रद्धा सूर्यवंशी, ज्योती राठोड, ज्योती साने, बालिका बोयणे तसेच आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार आणि अनेक शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन विशाल राठोड यांनी मानले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.