तुळजापूर (प्रतिनिधी): प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या निवेदिका प्राजक्ता माळी यांनी आज सायंकाळी आपल्या कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. कुलस्वामिनीचे दर्शन घेत प्राजक्ता माळी यांनी धार्मिक परंपरेनुसार देवीची ओटी भरली आणि कुलधर्म कुलाचार पार पाडले.
प्राजक्ता माळी या ‘स्वदेस’, ‘पावनखिंड’, ‘चंद्रमुखी’, ‘फुलवंती’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून प्रमुख भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री आहेत. अभिनयासोबतच त्या एक कुशल निवेदिका आणि संवेदनशील कवयित्री म्हणूनही ओळखल्या जातात.
दर्शनानंतर मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा, कवड्यांची माळ आणि महावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, अतुल भालेराव, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, ऋषभ रेहपांडे, दीपक शेळके, श्रीकांत पवार आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते.