तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा विस्तार वाढला; खासदार ओमराजे निंबाळकर यांचे निकटवर्तीय आरोपी?

Spread the love

तुळजापूर | तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरण नवीन वळण घेत असून, या प्रकरणात आता शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निकटवर्तीयावरही संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत 19 आरोपींना अटक केली असून, यामध्ये तुळजापूरमधील राहुल परमेश्वर याचे नाव समोर आले आहे. विशेष म्हणजे, राहुल परमेश्वर आणि अटकेत असलेला सुमित शिंदे हे दोघेही खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सोबतचे फोटो समोर आले आहेत व जवळचे सहकारी असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजप, काँग्रेसनंतर आता शिवसेनेवरही संशय

सुरुवातीला या प्रकरणात काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांवर संशय घेतला गेला. त्यानंतर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासोबत काही आरोपींचे फोटो समोर आल्यानंतर काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला. मात्र, आता तुळजापूरमधील राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे यांच्या अटकेनंतर शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव चर्चेत आले आहे.

खासदार निंबाळकर यांचे लोकसभेतील भूमिका आणि प्रत्यक्ष सत्य

गेल्या काही दिवसांपूर्वीच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत हा मुद्दा उचलून धरला होता. मात्र, आता त्यांच्या निकटवर्तीयांवर संशय घेतला जात असल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे, राहुल परमेश्वरचे वडील पोलीस खात्याशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी होत आहे.

धाराशिव, तुळजापूर आणि परंड्यात ड्रग्ज नेटवर्कचे धागेदोरे

ड्रग्ज नेटवर्क केवळ तुळजापूरपुरते मर्यादित नसून, त्याचे धागेदोरे धाराशिव आणि परंड्यापर्यंत पोहोचल्याचे काही न्यूज पोर्टल्सनी उघड केले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता परंडा, तुळजापूर आणि धाराशिव या तीन तालुक्यांची नावे समोर आली आहेत.

पोलीस तपासाच्या दिशेने सर्वांचे लक्ष

या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू आहे. पोलीस तपासातून या प्रकरणातील सत्य बाहेर यावे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे हद्दपार करण्यासाठी हा तपास कितपत प्रभावी ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: राजकीय आरोप-प्रत्यारोप नको, न्याय हवा!

धाराशिव जिल्ह्यातील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणाने सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवली आहे. या प्रकरणात भाजप, काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्यांची नावे चर्चेत येत आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणात फक्त राजकीय आरोप-प्रत्यारोप चालू असून, खऱ्या दोषींवर कारवाई करण्याऐवजी हा मुद्दा राजकारणासाठी वापरला जात असल्याची भावना जनतेत व्यक्त होत आहे.

राजकीय नेत्यांचे फोटो आणि टीका-टिप्पणी

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे फोटो विविध राजकीय नेत्यांसोबत व्हायरल होत आहेत. सुरुवातीला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नावे समोर आली, त्यानंतर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर आरोप झाले, आणि आता खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निकटवर्तीयांचेही या प्रकरणात नाव येत आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत असून, या मुद्द्यावरून राजकीय पक्ष एकमेकांवर चिखलफेक करत आहेत.

न्यायव्यवस्थेवर विश्वास हवा, राजकारण नको

ड्रग्ज प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत. राजकीय आरोपांमुळे मूळ गुन्हेगार सुटू नयेत आणि या प्रकरणाचा तपास कुठल्याही दबावाशिवाय व्हावा, अशी अपेक्षा आहे. जर पोलिसांनी योग्य तपास केला, तर जिल्ह्यातील ड्रग्जचे जाळे समूळ नष्ट होऊ शकते.

तपासाची गरज आणि कठोर कारवाईची मागणी

या प्रकरणात आतापर्यंत 19 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, अजून काही जणांची चौकशी सुरू आहे. तुळजापूर, परंडा आणि धाराशिव या तीन तालुक्यांमध्ये ड्रग्ज नेटवर्क कार्यरत असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. त्यामुळे केवळ राजकीय गोंधळ करून वेळ न दवडता, पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

(तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा अंतिम तपास निष्पक्ष होऊन न्याय मिळतो की राजकारणाचाच भाग बनतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.)


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!