शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी 25 मार्चला नारंगवाडीत रस्ता रोको आंदोलन

Spread the love

फोटो संग्रहीत

उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. पीक विमा, अतिवृष्टी अनुदान आणि निम्न तेरणा धरणाच्या उंचीवाढीच्या मुद्द्यांवर शेतकरी आक्रमक झाले असून, शासनाच्या धोरणांविरोधात हे आंदोलन होणार आहे.

प्रमुख मागण्या:

1️⃣ पीक विमा नुकसानभरपाई:
30 एप्रिल 2024 रोजीच्या पीक विम्याच्या भरपाईस अडथळा ठरणारे केंद्र सरकारचे परिपत्रक रद्द करावे. या परिपत्रकामुळे शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25,778 रुपयांऐवजी केवळ 6,200 रुपये मिळणार आहेत, याचा विरोध.

2️⃣ अतिवृष्टी अनुदान:
लोहारा आणि उमरगा तालुक्यांसाठी जिल्हा प्रशासनाने पाठवलेले 86 कोटींचे अतिवृष्टी अनुदान तातडीने मंजूर करून वाटप करावे. मराठवाड्यातील एकाही जिल्ह्याला 28 फेब्रुवारीच्या निर्णयानुसार अनुदान मंजूर झाले नाही, याचा निषेध.

3️⃣ निम्न तेरणा धरण उंची वाढीला विरोध:
धरणाची उंची वाढवल्यास अनेक शेतकरी भूमिहीन व बेघर होतील. यासंदर्भात 12 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात बैठक पार पडली होती. मात्र, यावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.

शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई करावी

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2023 व 2024 मध्ये सुमारे 1,500 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले असून, शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

आंदोलनाची पाश्र्वभूमी:

धाराशिव, तुळजापूर आणि उमरगा येथे यापूर्वी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले होते. मात्र, प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे आता जिल्ह्यात आठ ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पीक विमा याचिकाकर्ते अनिल जगताप यांनी दिली.

Antarsanwad News


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!