धाराशिव | 26 फेब्रुवारी 2025
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील पोलीस स्टेशन परिसर आणि सुभाषराव देशमुख यांच्या घराच्या परिसरात एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणूचा संसर्ग आढळल्याने संपूर्ण 10 किमी परिसर ‘अलर्ट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव यांनी संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत.
प्रमुख उपाययोजना:
- नागरिकांच्या हालचालींवर आणि पक्षी-प्राण्यांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू.
- बाधित परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी 2% सोडियम हायपोक्लोराईट किंवा पोटॅशियम परमॅंगनेट (KMnO₄) वापरण्याच्या सूचना.
- बाधित क्षेत्रातील 10 किमी त्रिज्येतील कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण करून नमुने प्रयोगशाळेत पाठविण्याचा निर्णय.
- संसर्ग रोखण्यासाठी पशुसंवर्धन, आरोग्य, महसूल, पोलीस, ग्रामविकास, जलसंपदा, वन, बांधकाम आणि परिवहन विभागांचा समन्वय.
- ‘Prevention and Control of Infectious and Contagious Diseases in Animals Act, 2009’ आणि ‘Action Plan for prevention, control & containment of avian influenza (Revised, 2021)’ अंतर्गत तातडीच्या उपाययोजना.
जिल्हा प्रशासनाने ढोकी गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, संदिग्ध रुग्ण किंवा पक्ष्यांच्या मृत्यूबाबत तातडीने प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
( फोटो – प्रतिकात्मक )
ढोकी शहरात बर्ड फ्लूचा संसर्ग , १० किमी परिसर “अलर्ट झोन” घोषित
धाराशिव दि.२५ फेब्रुवारी ढोकी शहरातील पोलीस स्टेशन परिसर व सुभाषराव देशमुख यांच्या घराच्या परिसरात आढळलेल्या मृत कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू (Avian Influenza H5N1) ची पुष्टी झाल्याने प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.या पार्श्वभूमीवर ढोकी शहराच्या १० किमी परिसराला “अलर्ट झोन” म्हणून घोषित करण्यात आले आहे.
धाराशिवचे जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव यांनी प्राण्यांमधील संक्रामक व संसर्गजन्य रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम,२००९ तसेच बर्ड फ्लू नियंत्रण कृती आराखडा (२०२१) अंतर्गत हा निर्णय घेतला आहे.या आदेशानुसार बाधित परिसरात नागरिकांची व पक्षी-प्राण्यांची वाहतूक बंदी घालण्यात आली आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ढोकीतील बाधित परिसर निर्जंतुकीकरण: करण्यात येणार आहे.२ टक्के सोडियम हायपोक्लोराइट (NaOH) किंवा पोटॅशियम परमॅग्नेट (KMnO₄) फवारून परिसराची स्वच्छता केली जाईल.बाधित भागात चुन्याची फवारणी केली जाणार आहे. कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण व प्रयोगशाळा चाचणी करण्यात येणार आहे.
१० किमी त्रिज्येत असलेल्या कुक्कुटपालन केंद्रांमधील पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.पशुसंवर्धन, आरोग्य, पोलिस,महसूल,ग्रामविकास,वन,जलसंपदा आणि परिवहन विभाग संयुक्तरीत्या उपाययोजना राबविणार आहे
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग नियंत्रण कायदा १८९७ अंतर्गत कठोर उपाययोजना केल्या जातील.बर्ड फ्लूचा संसर्ग अधिक पसरण्यापासून रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे.सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे,गर्दी टाळावी आणि संशयास्पद घटना तातडीने कळवाव्यात,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,धाराशिव यांनी केले आहे.