धाराशिव,दि.२१ फेब्रुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनांक घोष आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांच्या सूचनेनुसार आज,२१ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद धाराशिव येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.हे शिबिर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात पार पडले.
या आरोग्य तपासणी शिबिरात एकूण 179 अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.यात नेत्र तपासणी,रक्तदाब (BP),मधुमेह (शुगर), ईसीजी, हिमोग्लोबिन तसेच इतर प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या.तपासणीत काही कर्मचाऱ्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले,तर गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात आले.
शिबिरात आयुर्वेदिक उपचारांचे महत्त्व पटवून देण्यात आले,तसेच नियमित योग व व्यायामाचे फायदे यावरही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ज्या कर्मचाऱ्यांचे आभा कार्ड तयार झाले नव्हते,त्यांचे कार्ड काढण्यात आले,तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ई-केवायसी नोंदणी पूर्ण करण्यात आली.
कार्यक्रमात डॉ.एस.एस.फुलारी (निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय धाराशिव) आणि डॉ. अभिजीत बनसोडे (जिल्हा क्षयरोग अधिकारी) यांनी मार्गदर्शन केले. तसेच शिबिराचे नियोजन डॉ.प्रमोद गिरी यांनी केले.
—