सौंदरे गावच्या भारती नाडेने स्पर्धा परीक्षेत मिळवले यश
बार्शी – जिद्द, मेहनत आणि चिकाटीने कोणतंही स्वप्न साकार करता येतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे बार्शी तालुक्यातील सौंदरे गावची भारती दत्तात्रय नाडे. कोणताही खासगी क्लास न लावता, केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर भारतीने मंत्रालयीन महसूल सहाय्यक या पदावर यशस्वी प्रवेश मिळवला आहे. तिच्या या यशाने संपूर्ण गावभर आनंदाचे वातावरण आहे.
संघर्षमय वाटचाल
भारतीचे वडील दत्तात्रय नाडे हे एसटी महामंडळात चालक पदावर सेवा बजावत निवृत्त झाले, तर आई गृहिणी. अशा सामान्य कुटुंबातील भारतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मोठ्या अडचणींवर मात केली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने पुणे गाठले आणि अभ्यासाला सुरुवात केली. मात्र, कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या, त्यानंतर आरक्षणाचा मुद्दा, परीक्षा प्रक्रियेत होणारा विलंब अशा अनेक अडचणी आल्या.
मात्र, या अडचणींना न जुमानता, भारतीने जिद्द न सोडता स्वबळावर अभ्यास सुरूच ठेवला. कोणताही महागडा क्लास न लावता, स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर भारतीने हे यश संपादन केले.
आणखी मोठ्या स्वप्नांचा पाठलाग
मंत्रालयात महसूल सहाय्यक पदावर निवड झाल्यानंतरही भारतीचा प्रवास संपलेला नाही. ती म्हणते, “ही तर फक्त सुरुवात आहे. आता या जबाबदारीसोबतच पुढील मोठ्या पदांसाठी मी अभ्यास सुरूच ठेवणार आहे.” तिच्या या जिद्दीमुळे गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी तिचे अभिनंदन केले आहे.
बार्शीसह संपूर्ण तालुक्यात तिच्या या यशाची चर्चा असून, तिच्या संघर्षमय प्रवासाने अनेक विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे.