धाराशिवमध्ये शिवसेना शिंदे गटात दोन गट; पालकमंत्री सरनाईक यांच्या स्वागताचे बॅनर वादाच्या केंद्रस्थानी , मीच जवळचा!
धाराशिव शहरात शिवसेनेच्या शिंदे गटात गटबाजी उफाळून आली असून, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या 26 जानेवारी आगमनानिमित्त स्वागतासाठी शहरभर लावण्यात आलेले बॅनर हे मतभेदांचे प्रतीक ठरले आहेत. या बॅनरमुळे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क असलेला एक गट आणि आ. तानाजी सावंत समर्थक गट असे दोन गट स्पष्टपणे दिसून येत आहेत.
विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क असलेल्या गटाच्या बॅनरवर आ.तानाजी सावंत यांचा फोटो वगळण्यात आला आहे, ज्यामुळे आ. सावंत समर्थक गट नाराज असल्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे,आ. तानाजी सावंत समर्थकांनी स्वतंत्र बॅनर लावून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
शहरात झळकणारे पालकमंत्री सरनाईक यांच्या स्वागताचे दोन प्रकारचे बॅनर नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. काही नागरिकांनी ही गटबाजी पक्षासाठी अडचण ठरण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच, पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या सोबतचे फोटो व्हायरल करत, “मीच त्यांच्या जवळचा” असल्याचा संदेश देण्याचा प्रकार नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.
शिंदे गटातील या गटबाजीमुळे स्थानिक राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता असून, आगामी काळात या वादाचा परिणाम काय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.