तुळजापुरात शिर्डीच्या धर्तीवर सोयीसुविधांना प्राधान्य ,आमदर पाटील यांनी केली शिर्डी देवस्थानच्या कार्यपद्धतीची पाहणी

Spread the love

धाराशिव :

जगभरात शिर्डी देवस्थान नामांकित म्हणून गौरविले जाते. अगदी तसाच लौकिक तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर नगरीला मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

शिर्डीप्रमाणेच तुळजापूरमध्ये भाविकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देण्यावर आपला भर आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर संस्थांनच्या धर्तीवर तुळजापुरात कोणत्या सकारात्मक बाबी अंमलात आणता येतील याबाबत पाहणी करून माहिती जाणून घेतल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन अधिक सुलभ व्हावे, भाविकांच्या वेळेची बचत व्हावी, त्यासाठी शिर्डी आणि तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर भक्तांच्या सुविधेसाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यानुसारच एकविसशे कोटी रुपयांचा अंतिम तीर्थक्षेत्र विकास आराखडा दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर केला आहे. देवी दर्शनासाठी भाविकांना किती वेळ लागणार हे भक्तांना आधीच कळेल. त्यासाठी शिर्डी येथे केल्या जात असलेल्या कार्यपद्धतीची पाहणी केली. मागील वीस वर्षांत शिर्डी देवस्थानात कशापद्धतीने वेगात बदल घडवून आणला याबाबत शिर्डीचे आमदार तथा राज्याचे मंत्री राधाकृष्णजी विखे-पाटील यांच्याबरोबर शिर्डी विकासाबाबत प्रदीर्घ चर्चा झाली.याअनुषंगाने  तत्कालीन नगराध्यक्ष अशोक शेळके-पाटील व विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी  गोरक्ष गाडीलकर(IAS) यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात मागील काही वर्षांपासून भाविकांची मोठी वाढलेली गर्दी वाढत आहे. त्यामुळे अद्ययावत सोयी-सुविधांच्या पार्श्वभूमीवर विकास आराखडा राबविण्याची गरज ध्यानात घेऊनच आपण काम सुरू केले आहे. शिर्डी येथे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून आयएएस दर्जाच्या सनदी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. आपणही तुळजाभवानी मंदिरात अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. शिर्डी संस्थान येथे ६३०० कर्मचारी कार्यरत आहेत त्यापैकी सुरक्षेसाठी ९०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे कामात मोठी सुसूत्रता निर्माण झाली आहे. शिर्डी येथे श्री साई बाबांच्या मंदिराचे शिखर व गाभारा सोन्याने मढवला याची प्रक्रियाही यावेळी समजून घेतली. प्रसादालय व अन्नछत्राचे काम कसे चालते याबाबतही सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांसह मुख्य प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून जाणून घेतले. शिर्डी येथे आजघडीला १५ हजार भाविकांच्या निवासाची व्यवस्था शिर्डी  संस्थानने केली आहे. त्याव्यतिरिक्त  शिर्डीत साडेतीन हजार हॉटेल्सच्या  खोल्या उपलब्ध आहेत. तुळजापूर येथे देखील शिर्डीप्रमाणे निवास व्यवस्था बाबत नेमके काय करता येईल याबाबत चर्चा झाली. शिर्डी देवस्थानच्या सीईओनी काही महत्वपूर्ण सुधारणा सुचविल्या असून ते तुळजापूर येथे येऊन पाहणी करणार आहेत तसेच धाराशिव जिल्हाधिकारी यांनी देखील शिर्डी देवस्थान ला भेट देऊन त्यांच्या कामकाजाची माहिती घेण्याचे ठरले आहे.तुळजापूर तीर्थक्षेत्र वैश्विक दर्जाचे धार्मिक धार्मिक पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी आपण जो आराखडा तयार करत आहोत त्यासाठी शिर्डी संस्थानला दिलेली भेट अतिशय उपयुक्त ठरली असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!