संत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहे यांचा उर्सच्या आयोजनास सर्वांनी सहकार्य करुन आनंदाने साजरा करावा
अपर पोलीस अधिक्षक गौहर हसन

Spread the love

उर्स पुर्वतयारी आढावा

धाराशिव ( प्रतिनिधी ) धाराशिव येथे सुफी संत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गा येथे आयोजित उर्समध्ये दरवर्षी हिंदु मुस्लीमसह सर्व धर्माचे भाविक मोठया उत्साहाने व भक्तीभावाने सहभागी होतात. या उर्सची परंपरा ७२० वर्षाची आहे.यावर्षी देखील आयोजित करण्यात येणाऱ्या उर्ससाठी सर्वांनी सहकार्य करुन आनंदाने साजरा करावा.असे आवाहन अपर पोलीस अधिक्षक गौहर हसन यांनी केले.

यावेळी वाढलेले दुकानांचे व पाळण्याचे वाढलेलं दर कमी करण्यासाठी कोणीही प्रश्न उपस्थित केला नाही व प्रशासनाने देखील यावर लक्ष दिले नाही. ही सर्वसामान्यांसाठी खेदजनक बाब आहे अशी प्रतिक्रिया अंतरसंवाद न्यूजशी बोलता नागरिकांनी व्यक्त केली आहे. पाळीव जनावरे या ठिकाणी शिरणार नाहीत व नगरपालिकेच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. आरोग्य विभागाकडून भाविकांसाठी आरोग्य तपासणी केंद्र उभारण्यात यावी अशी देखील मागणी यावेळी अंतरसंवाद न्यूज शी बोलताना नागरिकांनी केली आहे.

आज ३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाजी हजरत ख्वॉजा शमशौद्दीन गाजी (रहे) शहशाहवली उर्स पूर्वतयारीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत श्री.हसन बोलत होते.यावेळी प्रभारी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश राठोड,मुख्याधिकारी वसुधा फड, तहसिलदार(महसूल)श्री.जगताप,
अन्य विभागाचे संबंधित अधिकारी तसेच उर्स आयोजन समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री.यादव म्हणाले,ऊर्सच्या काळात कोणतीही आपत्ती उद्भवणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.उर्स परिसरात मदत केंद्र स्थापन करून या केंद्रातील विविध विभागाचे संबंधित अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती असावी.ऊर्सच्या परिसरात वीज पुरवठा अखंडितपणे सुरू राहील,यासाठी वीज वितरण कंपनीने लक्ष द्यावे. ऊर्सचा परिसर हा स्वच्छ असावा.तेथील मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम व साफसफाईचे काम नगरपालिकेने वेळेत पूर्ण करावे.वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही याकडे पोलीस विभागाने लक्ष द्यावे.ऊर्समध्ये असणाऱ्या खाद्यपदार्थाच्या दुकानांनी नाममात्र परवाना रक्कम भरून अन्न व औषध प्रशासनाचे लायसन्स घ्यावे.ऊर्स काळात राज्यमार्ग परिवहन महामंडळांनी ज्यादा बसेसची व्यवस्था भाविकांसाठी करावी.असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकातून उर्स समितीचे सदस्य ऍड.परवेज अहमद यांनी ऊर्स हा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असल्याचे सांगितले.ऊर्सच्या आयोजनासाठी करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी उपस्थित ऊर्स आयोजन समितीच्या सदस्यांनी ऊर्सच्या यशस्वी आयोजनासाठी भाविकांची या काळात गैरसोय होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने व धाराशिव नगर परिषदेने सर्वतोपरी सहकार्य करावे. आवश्यक त्या सुविधा उर्स दर्गा परिसरात उपलब्ध करुन दयाव्यात.कब्रस्थानात वाढलेले गवत काढण्यात यावे.बंद असलेले पथदिवे सुरु करण्यात यावे.उर्स परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात यावे. तसेच भाविकांना धार्मिक विधी बघण्यासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात याव्यात.उर्स परिसरातील मोकाट गुरांचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा.दर्गा परिसरातील बारवची स्वच्छता करण्यात यावी.उर्स परिसरात मोबाईल टॉयलेटची व्यवस्था आणि पोलीस सक्रीयतेने उर्स परिसरात कार्यरत राहतील. अशी अपेक्षा यावेळी उर्स समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली.पूर्व तयारी आढावा बैठकीला उर्स समितीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!