धाराशिव शहरातील जिजाऊ चौक ते सांजा चौक या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे मागील आठवड्यातच रस्त्यावर अपघात होऊन एकाचा मृत्यू झालेला आहे असे असूनही सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी टक्केवारी घेण्यात मग्न असून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारास आश्रय देतात असे आरोप सामान्य नागरिकातून बांधकाम विभागावर होत आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे रस्ते गुणवत्तापूर्वक होत नाही व त्यामुळे रस्ते अपघातात सर्वसामान्य लोकांना प्राण गमवावे लागतात. धाराशिव शहरातील नागरिकांनी याबाबत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कॅनल मार्च काढून तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला तरी ही अजून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांना जाग येत नसल्याचे दिसून येत आहे
धाराशिव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय येथील काम तसेच अश्या अनेक प्रकारचे बोगस सिमेंट काँक्रीट चे काम त्यात धाराशिव पोहनेर मार्गे तुळजापूर ला जाणाऱ्या रस्त्यावर बोगस सिमेंट काँक्रीट चे झालेले आहे. सदर रस्त्यावर सिमेंट काँक्रीट चे काम ओबडधोबड करण्यात आलेला आहे त्यामुळे अनेक नागरिकांना पाठीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सिमेंट काँक्रीट चा रस्ता तयार करून एक महिनाही होत नाही तोपर्यंत रस्त्यावर मोठमोठ्याल्या भेगा पडलेले आहेत ठेकेदाराने अधिकाऱ्यांची संगणमत करून रस्त्यावर चिखल टाकला आहे रस्त्याच्या कडेला मुरमा ऐवजी मोठमोठाले दगड टाकण्यात आलेले आहे. म्हणजेच रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाने चिखलातून घसरून बाजूला टाकलेल्या दगडावर आपटून प्राणच द्यावे असा जणू सापळाच संबंधित ठेकेदाराने तयार केलेला आहे. त्यास सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची काहीच हरकत नसल्याची दिसून येते. काम होऊनही एक महिना पूर्ण झाला आहे परंतु हा मृत्यूचा सापळा अद्याप पर्यंत जशास तसा आहे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी येतात मृत्यूच्या सापळ्याचे दर्शन घेतात आणि कंत्राटदाराच्या आलिशान गाडीत बसून निघून जातात. त्यावर विचारले असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनिअर ठेकेदाराची बाजू घेऊन काम चांगले झाले असल्याचे ठामपणे सांगताना दिसतात. म्हणजेच सर्वसामान्य जनतेच्या प्राणाची किती किंमत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लावली आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. ठेकेदाराची पाठ राखण करण्यासाठी किती टक्केवारी घेतली असावी याचा अंदाज आपण सुजाण नागरिक लावू शकता.
अशा पद्धतीचे थातूरमातूर काम करणाऱ्या ठेकेदारावर तसेच थातूरमातूर काम करणाऱ्या कंत्राटदारास आश्रय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अत्यावश्यक आहे तेव्हाच धाराशिव जिल्ह्यातील रस्ते सुधारतील अन्यथा टक्केवारीच्या नादात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात अशाच प्रकारच्या मृत्यूच्या सापळ्याची निर्मिती करून स्वतःचे मात्र घर भरण्याचे काम करतील व त्यास मात्र सर्वसामान्य जनतेला आपल्या प्राणाशी मुकावे लागेल हे अत्यंत खेदजनक आहे.