Dharashiv :
महायुती सरकारने चालू पावसाळी अधिवेशनात राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा रु. १५०० मानधन देण्यात येणार आहे.
या योजनेच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी तुळजापूर विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी, बूथ प्रमुख, सुपर वॉरियर्स यांची प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे बैठक घेऊन ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन केले.
राज्य शासनाच्या वतीने या योजनेला अर्ज करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. तसेच नियम शिथिल केले आहेत. यामुळे राज्य सरकारचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले. प्रत्येक माता-भगिनी पर्यंत याचा लाभ पोहोचविण्याची जबाबदारी घ्यावी, असे यावेळी सौ. अर्चनाताई पाटील यांनी सांगितले.
राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पात्र माता-भगिनींना ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. यासोबतच अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अनेक अटीही शिथिल करण्यात आलेल्या आहेत.
जर अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर,
✅१५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड
✅मतदार ओळखपत्र
✅शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
✅जन्मदाखला
वरीलपैकी कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.
यासोबतच ५ एकर शेतीची अट मागे घेण्यात आली आहे.
वयाची अट २१ ते ६० वरुन २१ ते ६५ करण्यात येत आहे.
परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांसोबत विवाह केला असेल तर पतीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. तसेच २.५ लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना ‘उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रा’तून सूट देण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे. पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या किंवा निराधार महिले व्यतिरिक्त त्याच कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेचे प्रतिनिधिक स्वरुपात कार्यकर्त्यांना फॉर्म वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, माजी अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळे, राजाभाऊ पाटील, संतोष बोबडे, रामदास कोळगे, प्रभाकर मुळे, सिद्धेश्वर कोरे यांनीहि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून योजनेची माहिती दिली. कार्यक्रमास दत्ता देवळकर, नंदाताई पुनगुडे, आनंद कंदले यांच्यासह तुळजापूर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.