धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदारसंघातील प्रचाराचा आज समारोप होणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची व भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. देशाच्या प्रतिष्ठा व भवितव्यासाठी तसेच धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
धारशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी कळंब शहरातील अहिल्याबाई होळकर चौकात धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राणाजगजितसिंह पाटील, सुरेश पाटील, संजय मुंदडा, नितीन काळे, बंडूभाऊ बनसोडे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना कृषीमंत्री मुंडे म्हणाले, धाराशिव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाल्यानंतर मतदारसंघातील राजकीय वातावरण बदलले आहे. तर कळंबच्या या जाहीर सभेने महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा विजय निश्चित झाला आहे. दहा वर्षांपूर्वी दिवाळखोरीच्या अवस्थेला नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनवली आहे. यावरूनच दहा वर्षांत किती विकास झाला हे कळते. दहा वर्षांत एन.डी.ए सरकारने ८० कोटी जनतेला मोफत रेशन दिले, ३७० कलम रद्द केले, शेतकरी सन्मान योजनेतंर्गत प्रत्येक वर्षाला सहा हजार रूपये दिले आहेत. उज्वला गॅस योजनेतंर्गत कोट्यवधी गॅस कनेक्शन दिले आहेत.
विरोधकांकडे टिका करण्यासाठी मुद्दा नसल्यामुळे बुद्धिभेद करत मोदी संविधान बदलणार अशी टिका करत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानास सूर्य, चंद्र असेपर्यंत कोणीही बदलणार नाही. आचारसंहिता संपताच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले. आई तुळजाभवानी शक्तीपिठाचे नाव जगाच्या नकाशावर आणण्यासाठी मराठवाडा व धाराशिव जिल्ह्यात २१ टिएमसी पाणी आणण्यासाठी, मोठे उद्योग उभे करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.