धाराशिव दि.18 ( अंतरसंवाद न्यूज ) 7 मे 2024 रोजी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या 40-उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूकीतील गृहभेट मतदान पथक प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आज घेण्यात आले. गृहभेट मतदान पथकाचे प्रशिक्षण हे दोनवेळा घेण्यात येणार आहे. यातील प्रथम प्रशिक्षण हे आज दि.18 एप्रिल रोजी व द्वितीय प्रशिक्षण 25 एप्रिल 2024 रोजी घेण्यात येणार आहे. आजचे हे प्रशिक्षण दोन सत्रात घेण्यात आले. सकाळच्या सत्रामध्ये तुळजापूर तालुका तर दुपारच्या सत्रात धाराशिव तालुक्याचे प्रशिक्षण घेण्यात आले.
भारत निवडणुक आयोग यांचे पत्र दिनांक 31 ऑक्टोबर 2023 मधील परिच्छेद 16.1.2 मध्ये 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक तसेच दिव्यांग मतदारांना स्व-गृहातून मतदान करण्यासाठी सवलत देण्यात आलेली आहे. त्यानुसार मतदान संकलीत करण्यासाठी, मतदान पथके नेमणेबाबत सूचना दिल्या आहेत. आदेशामध्ये 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आणि 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ यांच्यासाठी संयुक्त प्रशिक्षण घेण्यात आले.
या प्रशिक्षणाअंतर्गत क्षेत्रीय अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी यांना संयुक्त प्रशिक्षण देण्यात आले.
हे प्रशिक्षण देण्यासाठी उपजिल्हधिकारी (रोहयो) प्रवीणकुमार धरमकर, उपजिल्हाधिकारी (मांजरा प्रकल्प) उदयसिंह भोसले, धाराशिवचे उपविभागीय अधिकारी तथा तुळजापूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय ढवळे, तहसीलदार अरविंद बोळंगे, कल्याण कुलकर्णी, संतोष पाटील, अमोल ताकभाते यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.