17-परभणी लोकसभा मतदार संघासाठी 5 उमेदवारांचे 7 अर्ज दाखल , आजपर्यंत 85 उमेदवारांना 114 नामनिर्देशन अर्जाचे वितरण
परभणी, दि.2 ( antarsawad news ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने 17-परभणी लोकसभा मतदार संघ निवडणुकीसाठी आज 5 उमेदवारांनी 7 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. आजपर्यंत एकुण 9 उमेदवारांचे 18 नामनिर्देशन अर्ज स्विकारण्यात आले आहे. तर आज 24 उमेदवारांना 27 नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 85 इच्छुक उमेदवारांना 114 नामनिर्देशन अर्जाचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघूनाथ गावडे यांनी दिली आहे.
17-परभणी लोकसभा मतदार संघासाठी आज दि. 02 एप्रिल रोजी जानकर महादेव जगन्नाथ (राष्ट्रीय समाज पक्ष), बोबडे सखाराम ग्यानबा (अपक्ष), मुस्तफा मैनोदीन शेख (अपक्ष), राजन रामचंद्र क्षीरसागर (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) यांनी प्रत्येकी एक नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे. तर जाधव संजय (बंडू) हरिभाऊ (शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)) यांनी तीन नामनिर्देशन अर्ज दाखल केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.
यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेतले. उमेदवारांना गुरुवार, दि.4 एप्रिलपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 3 यावेळेत आपले नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहे. शुक्रवार, दि. 5 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. 8 एप्रिल, 2024 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहे. तर शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी 17-परभणी लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीचा निकाल मंगळवार दि. 4 जून रोजी लागणार आहे.