धाराशिव दि.१७ ( antarsawadnews ) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी घोषित केल्याने ४० – उस्मानाबाद लोकसभा क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची निवडणूक विषयक कामे पार पाडण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.नोडल अधिकाऱ्यांवर निवडणुकीची सोपविलेली जबाबदारी त्यांनी अत्यंत दक्षतेने व चोखपणे पार पाडावी.असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिले.
१६ मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित निवडणूक नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी शोभादेवी जाधव व उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.ओंबासे म्हणाले,लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने तहसीलदार,गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी लावलेली राजकीय पक्षांचे झेंडे, जाहिरातीचे फ्लेक्स व बॅनर तात्काळ काढून घ्यावे.यासाठी भरारी पतके गठीत करून या कामाला प्राधान्य द्यावे.केलेल्या कामाचा अहवाल तात्काळ सादर करावा.उद्घाटन व भूमिपूजनाच्या कोनशीला झाकून घ्याव्यात.विविध विभागांच्या संकेतस्थळावर कोणतेही राजकीय नेत्यांचे फोटो नसावे.रुग्णवाहिकांवर असलेली नावे झाकून टाकावीत. घरांवर झेंडे व जाहिराती लावण्यात आल्या असतील तर त्या काढून घ्याव्यात. वीज वितरण कंपनीच्या खांबावर लावलेले राजकीय जाहिरातींचे फलक काढून टाकावेत. ज्या कामांचे कार्यादेश दिले असतील ती कामे सुरू ठेवावीत. पाणीटंचाई निवारणाची कामे सुरू राहतील असे डॉ.ओंबासे यावेळी म्हणाले.
निवडणुकीच्या काळात भ्रमणध्वनीवर येणाऱ्या अनोळखी क्रमांकाला नोडल अधिकारी व निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद दयावा असे सांगून डॉ.ओंबासे म्हणाले, प्रतिसाद न देणाऱ्या प्रकरणी गंभीर दखल घेण्यात येईल. भ्रमणध्वनीवर येणारा कोणताही कॉल टाळू नये. ७६ एफएसटी पथके निवडणूक काळात कार्यान्वित राहतील.राजकीय पक्षांना विविध कामांचे साहित्य,वस्तू व खाद्यपदार्थ खरेदीचे दरपत्रके उपलब्ध करून द्यावी.राजकीय पक्षांच्या सुविधेसाठी त्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार व पारदर्शकपणे निवडणूक पार पाडण्याच्या दृष्टीने नोडल अधिकारी व निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात.असे डॉ. ओंबासे यावेळी म्हणाले.
मतदान जागृती व्यापक प्रमाणात करण्यासाठी तसेच मोठ्या संख्येने मतदारांनी विशेषता महिला मतदारांनी मतदान करावे,यासाठी स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. निवडणूक काळात कोणत्याही अधिकाऱ्याने विनापरवानगी मुख्यालय सोडू नये.अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.निवडणूक आयोगाच्या नियमानुसार नागरिकांनी निवडणूक काळात रोकड जवळ बाळगावी. असेही डॉ. ओंबासे म्हणाले.
या बैठकीला आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, मतदान कर्मचारी व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी संतोष भोर,प्रशिक्षण व्यवस्थापन कक्षाचे तसेच टपाली मतपत्रिका छपाई कक्षाचे नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले, साहित्य मागणी व वितरण कक्ष,ओळखपत्र तयार करणे व वितरण कक्षाचे नोडल अधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,वाहन व्यवस्थापन पक्षाचे नोडल अधिकारी संतोष राऊत,संगणक सुरक्षा, आय.टी एप्लीकेशन कक्षाचे नोडल अधिकारी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे,मतदान जनजागृती कक्षाच्या नोडल अधिकारी शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे,कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरुणा गायकवाड, ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत,खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी सचिन इगे,मतपत्रिका छपाई नोडल अधिकारी तथा कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील, माध्यम व सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,समन्वय,दिव्यांग मतदार,मदत व सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.एम. गिरी,तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष व नियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे,निवडणूक निरीक्षक यांचे नोडल अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, सी-सिव्हिल व विविध परवाने नोडल अधिकारी प्रवीण पांडे,अवैध दारू वाटप प्रतिबंध कक्षाचे नोडल अधिकारी तथा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे,प्रथमोपचार सोयी सुविधा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला यांची या बैठकीला उपस्थिती होती.
दूरदृश्यप्रणालीद्वारे बार्शी उपविभागीय अधिकारी,तहसीलदार औसा उपविभागीय अधिकारी,तहसीलदार तसेच जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार,गटविकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते.