पत्रकारांनी मन की बात नही जन की बात मांडावी आमदार कैलास पाटील
पत्रकारांच्या घरांसाठी निधी लोकप्रतिनिधी म्हणून कमी पडू देणार नाही
धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) – पत्रकारांनी लोकांना दिलेली खोटी आश्वासने व खोट्या स्वप्नांच्या आश्वासनाच्या बातम्या करण्याऐवजी समाजाच्या उपयोगी पडतील अशा सकारात्मक बातम्या द्याव्यात. तसेच लोकांनी केलेल्या चांगल्या कामांच्या बातम्यांना चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध देऊन त्याचा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम तर करावेच. विशेष म्हणजे मन की बात ऐवजी जन की बात आपल्या वृत्तपत्रातून निर्भीडपणे मांडावी असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी दि.३ मार्च रोजी केले.
व्हॉईस ऑफ मीडिया धाराशिव जिल्हा शाखेच्यावतीने जिल्ह्यातील पत्रकारांचा अपघात विमा व आयुष्यमान भारत योजना कार्डचा वितरण सोहळा धाराशिव शहरातील बीएसएनएल कार्यालयाच्या समोरील आर्यन फंक्शन हॉल येथे करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिद्धिविनायक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ प्रतापसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, व्हाईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष वैभव पारवे, मराठवाडा उपाध्यक्ष अमर चोंदे आदी उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पुढे बोलताना आमदार कैलास पाटील म्हणाले की, पत्रकार जनतेचा आवाज होऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने आपल्या दैनिकांमध्ये प्रश्न मांडून प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देतात. त्यामुळे त्या समस्या सोडविण्यासाठी आम्हाला देखील मदत होते. मात्र पत्रकारांच्या देखील काही समस्या असून यामध्ये त्यांचे स्वतःचे घर असणे आवश्यक आहे. त्यामुळे घरांसाठी आवश्यक असलेला निधी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कुठेही कमी पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तसेच आजपर्यंत आपल्या जिल्ह्याची असलेली नकारात्मक ओळख पत्रकारांनी आपल्या लेखणीतून सकारात्मक बातम्या लिहून नव्याने जिल्ह्याची ओळख निर्माण करण्याचे काम करावे असे आवाहन केले. त्याबरोबरच एखाद्या लोकप्रतीनिधीने खोटी स्वप्न दाखवू नयेत असे सांगत केवळ वारंवार विकास होतोय अशी आश्वासने देण्याऐवजी विकास कामे पूर्ण केल्यानंतर त्या बातम्या पत्रकारांना आवर्जून द्याव्यात असा टोलाही त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. तर पत्रकारांनी केवळ आणि केवळ पॉझिटिव्ह म्हणजेच सकारात्मक पत्रकारिता करून जिल्ह्याची नव्याने ओळख करावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला ज्या ज्या गोष्टी करणे शक्य आहे त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तर दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले की, पत्रकारांनी धाराशिव जिल्ह्यात नव्याने उभे झालेल्या उद्योगांची ओळख आपल्या लेखणीतून मांडली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. तसेच पत्रकारांना स्वतःला विकास पाहिजे असेल तर त्याची स्वतःची हक्काची जागा असली पाहिजे. कारण पत्रकारांना संपर्क साधण्यासाठी ते अतिशय महत्त्वाचे साधन असून त्याचा अनेकांना फायदा होत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे पत्रकारांनी विकास व उद्योगांची मांडणी नव्याने करावी लागेल असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे पूर्वीच्या व आताच्या पत्रकारितेमध्ये फार मोठा बदल झाला असून दर मिनिटाला ब्रेकिंग न्यूज येत आहेत. त्या ब्रेकिंगमध्ये हॅपनिंग काय आहे का ? त्यापासून आपणाला काय मिळणार आहे का ? हे पाहण्याबरोबरच पत्रकारांनी बदलायला शिकले पाहिजे असे त्यांनी सांगितले. तसेच युवकाच्या पाठीवर थाप मारली तर तो चांगला उद्योजक होऊ शकतो असे नमूद करीत ते म्हणाले की, पत्रकारांनी दिवसाचा फक्त १०-१० मिनिटांचा वेळ उद्योगासाठी द्यावा. तर पत्रकारांनी केवळ पत्रकार न राहता उद्योजक व्हावे असे त्यांनी नमूद केले. महत्त्वाचे म्हणजे पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपली निर्माण केलेली कीर्ती ही त्याची सर्वात मोठी श्रीमंती असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच दिव्या भोसले म्हणाल्या की, व्हॉईस ऑफ मीडियाने पत्रकारांसाठी घर, पत्रकारांचा कौशल्य विकास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्य व पेन्शन ही पंचसूत्री हाती घेऊन सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे…. अहद् तंजावर तहद् पेशावर अवघा मुलुख आपला… याप्रमाणे काम करून स्वराज्य निर्माण केले. अगदी त्याच पद्धतीने या संघटनेचे काम सुरू असून पत्रकार व पत्रकारितेचा दृष्टिकोन बदलावा यासाठी सकारात्मक पत्रकारिता करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे त्यांनी विशेषत्वाने सांगितले.
त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन पत्रकारांसाठी उभा राहणे फार गरजेचे असल्याचे नमूद केले. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकारांची १०० घरे बांधण्याचा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपला लढा आपल्यालाच लढावा लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत पत्रकारांनी एकत्रित राहून काम करावे असे आवाहन त्यांनी केले. तर संजय पाटील दुधगावकर म्हणाले की, व्हॉईस ऑफ मीडियाने सकारात्मक पत्रकारितेचा पाया भरला असून पत्रकार म्हणजे चीटिंग करणारा असलेली प्रतिमा पुसून टाकली असल्याचे त्यांनी सांगितले. तर या संघटनेची पंचसूत्री अतिशय चांगली व वास्तव असून या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये जागृती निर्माण झाली असून सदस्यांच्या संख्येमध्ये वाढत होत असल्याने ही अतिशय चांगली बाब असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत असून दुष्काळी योजना राबविण्यासाठी प्रशासनाने अजूनही पावले उचलली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये दुष्काळाच्या प्रश्नावर पत्रकारांनी सातत्याने आपला आवाज उठवावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी साप्ताहिक विंगच्या जिल्हा संघटकपदी मयूर काकडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. तर रमजान पठाण व लतिफ शेख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढून देण्यासाठी ई-केवायसीचे जिल्हा व्यवस्थापक रमजान पठाण, लतिफ शेख, इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंकेचे वरिष्ठ शाखा प्रबंधक चंद्रकांत झेंडे, सहाय्यक प्रबंधक अमर बावीकर, किशोर लोंढे, सूर्या खंडागळे, बालाजी लोमटे, महेश देशपांडे, प्रवीण बेडके, सत्यजित साडेकर, अनिकेत कोळगे, स्नेहल कांबळे, प्रतीक्षा घुगे, अमिता दंडनाईक, मयूर जंगले यांनी दोन्ही कार्ड काढण्याचे काम केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी तर सूत्रसंचालन शरद अडसूळ व तानाजी घोडके यांनी तर आभार कुंदन शिंदे यांनी मानले. यावेळी ३०० पेक्षा जास्त पत्रकारांचा विमा व आयुष्यमान भारत योजना कार्ड काढण्यात आले. या कार्यक्रमास पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.