धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे रेल्वेचा थांबा व्हावा ही ढोकी परिसर, कळंब तालुक्यासह केज तालुक्यातील अनेक गावांची मागणी गेली अनेक वर्षापासून आहे. मोठी रेल्वे सुरू झाल्यापासून या परिसरातील नागरिकांना रेल्वेसाठी धाराशिव येथे जावे लागते. त्यामुळे ढोकी येथे थांबा करण्याबाबत रेल्वे संघर्ष समितीने भेट घेऊन विनंती केली होती. त्यानुसार DRM, सोलापूर यांच्यासोबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी चर्चा केली व सकारात्मक कार्यवाही करण्याबाबत सूचित केले होते. तसेच पत्र देऊन रेल्वे संघर्ष समिती मधील काही सदस्यांना DRM, सोलापूर यांना समक्ष भेटून चर्चा करण्यास आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
चर्चेच्या अनुषंगाने DRM, सोलापूर यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबत कळविले आहे. मुंबई येथे श्री.धिरेंदर सिंग Dy CCM (PM) यांच्या कार्यालयाकडे याबाबत आपला पाठपुरावा सुरू आहे. तांत्रिक बाबींवर त्यांच्याकडे कार्यवाही सुरू आहे. परंतु सदर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी व ढोकी येथील थांबा सुरू व्हावा या अनुषंगाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे मागणी केली. भेटी दरम्यान सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गाचे काम, धाराशिव रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्मचे काम तसेच इतर बाबींवर चर्चा झाली. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होऊन आपल्या मागणीस न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. अशी माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे