धाराशिव : शहरातील 17 किलोमीटर लांबीच्या सर्व्हिस रोड सह त्यावरील पथदिवे, येडशी येथील उड्डाणपूल आणि सिंदफळ जवळील लातूर रोड जंक्शन उड्डाणपुलासाठी 122 कोटी 90 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सिध्दाई मंगल कार्यालयात शुक्रवार, 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
शहरवासीयांसह प्रवाशांची मोठी गैरसोय दूर व्हावी, अपघातांचे प्रमाण घटावे यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. सोलापूर-येडशी महामार्गावरील धाराशिव शहरातील बायपास सर्व्हिस रोड, येडशी येथील उड्डाणपुल व सिंदफळनजीक लातूर जंक्शन उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. ही कामे मंजूर करून घेवून त्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्यांसोबत बैठका घेतल्या.
धाराशिव शहरातील 17.25 किलोमीटर लांबीचा सर्व्हिस रस्ता व त्यावरील पथदिव्यांसाठी 68 कोटी 41 लाख रूपये, येडशी येथील उड्डाणपुलासाठी 27 कोटी 70 लाख रूपये, लातूर रोड जंक्शन उड्डाणपुलासाठी 26 कोटी 79 लाख रूपये, असे एकूण 122 कोटी 90 लाख रूपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. या कामांचे कार्यारंभ आदेशही झाले आहेत. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला आहे. शहरातील सिध्दाई मंगल कार्यालय येथे 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. केंद्रातील भाजप सरकारमुळे जिल्ह्यातील अनेक विकासात्मक विषय मार्गी लागत आहेत. तुळजापूर-औसा महामार्गावरील काक्रंबा येथील उड्डाणपूल, तुळजापूर शहर व ताकविकी येथील पर्यायी रस्ता व जळकोट येथील भुयारी मार्गासाठी देखील निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच बार्शी-टेंभुर्णी रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या रस्त्यासही लवकरच मान्यता मिळणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.