पुण्यात चोरीच्या संशयावरून घरकाम करणार्या महिलेला मारहाण आणि शिवीगाळ प्रकरण, देवाभाऊंच्या एका फोननंतर २४ तासांत संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांवर तातडीनं निलंबनाची कारवाई
पुणे – चोरीच्या संशयावरून चौकशीसाठी पोलीस चौकीत आणलेल्या मोलकरीण महिलेला शिवीगाळ करीत बेदम मारहाण करणे पोलिसांना चांगलेच भोवले असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक सहायक निरीक्षक आणि दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. घरकाम करणार्या महिलेला झालेल्या गंभीर मारहाणीच्या प्रकरणात थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच पुण्याचे नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला. फोनवरून याबाबत सविस्तर माहिती घेत संबधित पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याच कळतय. कसलाही पुरावा नसताना केवळ संशयावरून घरकाम करणार्या ह्या गरिब होतकरू महिलांच्या बाबतीत पोलिसांची ही पद्धत खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्ट सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
ही कारवाई मंगळवारी (दि. १३) करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद दोरकर, मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या पोलीस शिपाई उषा सोनकांबळे (मुख्यालय शिवाजीनगर) आणि पोलीस शिपाई वैशाली उदमले अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत. (Pune Police News)
परिमंडळ पाचचे उपायुक्त आर. राजा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘‘तक्रारदार महिलेने पोलिसांवर मारहाणीचे आणि शिवीगाळ केल्याचे आरोप केले आहेत. हे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. या महिलेच्या अंगावर मारहाणीचे वळ होते. त्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगण्यात आले होते. या वैद्यकीय तपासणी अहवालामध्ये या महिलेला इजा झाल्याचे नमूद आहे. त्यामुळे एक सहायक निरीक्षक, दोन महिला पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे. या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वैयक्तिक चौकशी निर्गमित करण्यात आली आहे. प्राथमिक कारवाई म्हणून निलंबन करण्यात आले आहे.’’
याबाबत तक्रारदार महिलेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यांनी कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेत तक्रार केली होती. ही महिला मोलकरीण म्हणून काम करते. ती ज्या घरात मोलकरीण म्हणून काम करते, त्या घरामध्ये दागिन्यांची चोरी झाली होती. या घरातील कुटुंबीयांनी तक्रारदार महिलेवर संशय व्यक्त केला होता. तिला घरामध्ये डांबून ठेवले होते. तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. पोलिसांनी तिला मगरपट्टा पोलीस चौकीत चौकशीसाठी आणले. त्यावेळी पोलिसांनी तिला बेदम मारहाण केली होती. तिला शिवीगाळ केली होती. तहान लागल्यावर प्यायला पाणी मागितले असता ‘मूत पी’ असे म्हणत उपनिरीक्षकासह चार पोलिसांनी मिळून मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला होता. तिचे नातवाईक शोध घेत पोलीस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना पोलीस चौकीत पाठविण्यात आले. त्यावेळी महिलेला मारहाण सुरू होती. तिच्या पायावर आणि अंगावर मारहाणीचे वळ उठलेले होते. याबाबत नातेवाईकांनी पोलीस चौकीत जाऊन आरडाओरडा करीत पोलिसांना जाबदेखील विचारला होता. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने नातेवाईकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. यातच खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणार्या फडणवीसांकडूनच या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर २४ तासाच्या आतच संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय आहे.