सांगली कोल्हापूर चे पुराचे पाणी धाराशिव जिल्ह्यातील आणण्यासाठी प्रयत्न , जागतीक बँकेचे पथक १४ ला पाहणीसाठी धाराशिव जिल्ह्यात – आ.राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी वळवून धाराशिव जिल्ह्यात आणण्यासाठी आपण आग्रही होतो.याला पूरक प्रकल्पाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने जागतिक बँकेचे पथक १४ रोजी धाराशिव जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर येणार असून सदर पथक कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची पाहणी करणार असल्याची माहिती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे नियंत्रण करण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी दिली. या प्रकल्पाला जोडून पुराचे पाणी दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यात वळवणेसाठी १०० किमी बोगद्यातून पुराचे पाणी नीरा नदीत सोडण्यात येणार असून उद्धट बॅरेज मधून पुढे ते उजनी धरणात सोडले जाणार असून तिथून पुढे ते घाटने बॅरेजच्या माध्यमातून रामदरा तलावात सोडून धाराशिव जिल्ह्यात आणायचे नियोजन आहे.या प्रकल्पासाठी अंदाजे १५ हजार कोटींचा निधी लागणार आहे.जागतिक बँकेच्या माध्यमातून यासाठी कर्ज मिळण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे आ.पाटील यांनी म्हटले आहे.
२३.६६ टीएमसी च्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या पाहिल्या टप्प्यात ७ टीएमसी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरीत १६.६६ टीएमसी पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.यामुळे जिल्ह्यातील १ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.हा प्रकल्प अवर्षण प्रवण धाराशिव जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याची क्षमता असणारा असून यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे.
जागतिक बँकेच्या पथकासमोर आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या धाराशिव जिल्ह्यासाठी हा प्रकल्प कसा महत्वपूर्ण आहे.हा प्रकल्प झाल्याने इथल्या नागरिकांच्या अर्थकारणावर त्याचा कसा परिणाम होणार आहे याबाबत सादरीकरण करण्यात येणार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या सहकार्याने जागतिक बँकेकडून यासाठी निधी उपलब्ध होईल असा आशावाद आ.पाटील यांनी व्यक्त केला आहे