धाराशिव-तुळजापूर-सोलापूर मार्गासाठी अंतरिम बजेट मध्ये २२५ कोटींची तरतूद – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Spread the love

Osmanabad solipur Railway

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यात धाराशिव-तुळजापूर या ३० किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी अंतरिम अर्थसंकल्पात २२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर राज्याचा ५०% हिस्स्याचे ४५२ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे रेल्वेने ५४४  कोटी रूपयांच्या कामाची निविदा प्रकाशित केली आहे.आता अंतरिम अर्थसंकल्पात यासाठी केलेल्या तरतुदीमुळे या प्रकल्पाला अधिक गती मिळेल.२०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाराशिव जिल्ह्यातील जनतेला दिलेला शब्द खरा करून दाखवला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या एकूण ८४.४४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यात धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे केले आहेत. या रेल्वेमार्गावर एकूण ११० पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ३२ गावांतील एक हजार ३७५ एकर जमीन त्यासाठी भूसंपादीत करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. धाराशिव तालुक्यातील नऊ आणि तुळजापूर तालुक्यातील १५ गावांमधील ४९४.२६  हेक्टर जमिनीचे भूसंपादन सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. 

रेल्वेमार्ग निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचे टप्पे पाडण्यात आले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यात आली आहे. तिसर्‍या टप्प्यात बोगद्याच्या कामांना हाती घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या रेल्वेमार्गासाठी ४५२.४६ कोटी रूपयांच्या निधीला तत्काळ मंजुरी देण्यात आली. आता अंतरिम अर्थसंकल्पात याला २२५ कोटींची तरतूद केल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रेल्वेमार्ग पूर्णत्वाच्या टप्प्यावर आला आहे. 

महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत राज्य सरकारच्या हिश्श्यातील ५० टक्के निधी रखडला होता. त्यामुळे तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला जोडणार्‍या रेल्वेमागार्र्च्या कामाला उशीर झाला. ठाकरे सरकारच्या कालावधीत निधी उपलब्ध करून दिला असता तर तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला रेल्वेच्या नकाशावर येण्यासाठी एवढा विलंब लागला नसता, अशी प्रतिक्रियाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.

तीन नवीन रेल्वेस्थानक

धाराशिव-तुळजापूर या ३० किलोमीटर रेल्वेमार्गावर तीन नवीन रेल्वेस्थानके उभारली जाणार आहेत. धाराशिव ते सांजा या १० किलोमीटर अंतरावर सांजा येथे पहिले रेल्वे स्थानक असणार आहे. सांजा ते वडगाव या १२ किलोमीटर अंतराच्या टप्प्यावर दुसरे रेल्वेस्थानक तर वडगाव ते तुळजापूर या आठ किलोमीटर अंंतरावर तिसरे स्थानक उभारले जाणार आहे. या रेल्वेमार्गावर एकूण चार स्थानके असणार आहेत. त्यात धाराशिव येथील सध्या अस्तित्वात असलेल्या मुख्य रेल्वेस्थानकाचाही समावेश आहे. या मुख्य रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी नुकतेच नरेंद्र मोदी यांच्या सरकारने २१ कोटी रूपयांचा निधी सुपूर्द केला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!