धाराशिव-
दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकर्यांना धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनी, 26 जानेवारी रोजी धार्मिक एकता ट्रस्टच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बँकेच्या कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळे देशभरात 50 हजारहून अधिक शेतकर्यांनी आत्महत्या केली. धनदांडग्या उद्योगपतींचे कर्ज माफ करणार्या सरकारने शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी करुन यापुढे कोणत्याही शेतकर्याने आत्महत्येचा मार्ग पत्करु नये, असे आवाहन धार्मिक एकता ट्रस्टचे वैद्य श्री.नवनाथ दुधाळ यांनी केले.
धार्मिक एकता ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कर्जमुक्त भारत अभियानाने आता मोठ्या चळवळीचे रुप धारण केले आहे. या अभियानची सुरुवात आयपीएलचे प्रशिक्षक असलेले शाहनवाज चौधरी भारतीय यांनी केली. दीड वर्षापूर्वी हे अभियान सुरु करण्यात आलेले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्जाच्या खाईत अडकलेली संपूर्ण भारतातील 13.50 लाख कुटुंब या अभियानात सहभागी झालेली आहेत. कर्ज आणि सरकारच्या चुकीच्या धोरणुमुळे हैराण होऊन अनेकांनी आपला जीव गमावला असून यासाठी केवळ सरकारच्या चुकीच्या धोरणाला जबाबदार धरले जात आहे. आजपर्यंत संपूर्ण भारतातील दोन लाखाहून अधिक लोकांना या संस्थेने आत्महत्येपासून परावृत्त केले आहे.
याचाच एक भाग म्हणून कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकर्यांना प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासोबत जिल्हाधिकार्यांना निवेदनही देण्यात आले. या श्रद्धांजली सभेला शेकडो लोक उपस्थित होते. सभेत अनेकांनी आपले अनुभव आणि व्यथा मांडल्या. हे अनुभव ऐकून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले.
ज्याप्रमाणे धनदांडग्या उद्योगपतींचे कर्ज माफ झाले, त्याचप्रमाणे सर्वसामान्यांचे कर्जही माफ करावे, अशी मागणी उपस्थित कर्जबाजारी व्यक्तींनी केली. सरकारने कर्जमाफी न केल्यास येत्या 2024 च्या निवडणुकीत जनता स्वतःलाच मतदान करेल. त्यानंतर ते सभागृहात जाऊन कर्ज माफ करतील. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की, कर्जमुक्त भारत अभियानच्या चळवळीला देशभरात वेग आला तर आगामी निवडणुकीच्या निकालात फरक पडू शकतो, असा इशाराही धार्मिक एकता ट्रस्टच्या वतीने देण्यात आला. कार्यक्रमाला वैद्य नवनाथ दुधाळ, साजीद शेख, छगन तोडकरी, किरण गुरव, सतीश देशमुख, दादासाहेब अंकुश, रोहीत सूर्यवंशी, सुनील थोरात, तुकाराम अवधूत, रंगनाथ अवधूत, दामोदर अवधूत, भीमराव अवधूत, आनंद अवधूत, वजीर शेख, वसंत अवधूत, शिवाजी अवधूत, महारुद्र अवधूत यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.