नवमतदारांना मतदार ओळखपत्र वाटप , राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
धाराशिव,दि.25 ):- दि.25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली . सन 2011 पासून संपूर्ण देशभरात 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ.सचिन ओम्बासे , जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली व श अतुल कुलकर्णी , पोलीस अधिक्षक, धाराशिव, शिरिष यादव , उप जिल्हा निवडणूक अधिकारी धाराशिव, डॉ.शिवानंद बिडवे, तहसिलदार धाराशिव, सोशल मिडीया स्टार श्री राहुल (दादा ) लकडे, सोशल मिडीया स्टार श्रीमती सुनिता चव्हाण, बोलका बाहुला हसमुखराव फेम श्री उदयसिंह पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव सिनेट सदस्य श्री देविदास पाठक, परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्गचे अध्यक्ष मारुती बनसोडे, प्रमुख यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृह, धाराशिव येथे आज दि. 25 जानेवारी ,2024 रोजी 14 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी यांच्या प्रभात फेरीने करण्यात आली.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृह धाराशिव येथे मतदार नोंदणी अनुषंगाने उत्कृष्ठ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), मतदार नोंदणीमध्ये सहकार्य करणा-या उत्कृष्ठ सामाजिक संस्था तसेच महाविद्यालय यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. प्रातिनिधीक स्वरुपात 18-19 वयोगटातील नव मतदार, दिव्यांग नव मतदार , भटक्या जमाती व विमुक्त जाती मधील नव मतदार यांना मतदान कार्ड व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला . ज्येष्ठ नागरिक यांचाही प्रातिनिधीक स्वरुपात गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास नागरिक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी नागरिकांना मतदार नोंदणी करण्याचे तसेच 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्दी करण्यात आलेल्या अंतीम मतदार यादीमध्ये नाव असल्याचे खात्री करण्याचे आवाहन केले आहे.