भूम व तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन
धाराशिव,दि,२१ (जिमाका) धाराशिव जिल्हा विकासाच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांपेक्षा पुढे असावा या उद्दिष्टाने आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी केले.
पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते आज २१ जानेवारी रोजी भूम शहर व तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि विविध समाजातील नागरिकांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत,भूम नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे,माजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,दत्ता साळुंखे,प्रशांत चेडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हांडोंगरीकर,सुभाष सिद्धीवाल, जाकीर सौदागर,निश्चित चेडे,नागनाथ नाईकवाडे, शाकीर शेख,संजय शिंदे व विशाल ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत पुढे म्हणाले की,धाराशिव जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी कृष्णा भीमा खोऱ्याचे पाणी उजनी धरणात आणून ते पाणी लिफ्ट करून कोडगाव धरणात आणण्यासाठी राज्य शासनाकडून ११ हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर झाला आहे.७० टक्केपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. हे पाणी सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत कवडगाव धरणात येईल.फेब्रुवारी महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याचीही शक्यता असल्याचे पालकमंत्री श्री. सावंत म्हणाले.
कष्टाळू शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यास या भागाचाही पश्चिम महाराष्ट्रासारखा विकास होईल.या जानेवारी महिन्यातच जिल्ह्यातील भूम,परांडा व वाशी आणि कळंब तालुक्यात विविध विकास कामे आणि रुग्णालयांचे भूमिपूजन झाले आहे.जिल्ह्यात आरोग्य क्रांती आणण्याचे हे प्रथम उदाहरण आहे. यापुढे जिल्ह्यात हरितक्रांती, धवल क्रांती आणि जलक्रांती घडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.तसेच भूमिपूजन झालेली व सुरू असलेली कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.जनतेला विकासाचे फळ मिळाले पाहिजे.या हेतूने सर्व कामे उत्कृष्ट दर्जाची व टिकाऊ होतील याची काळजी येथील नागरिकांनी घेणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष संयोगिता गाढवे यांनी आरोग्य केंद्रात डायलेसिस मशीन आणि सिटीस्कॅन मशीन उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्य मंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यावर पालकमंत्री डॉ.सावंत यांनी एक महिन्याच्या आत डायलेसिस मशीन आणि मार्च अखेरपर्यंत सिटीस्कॅन मशीन कार्यान्वित होईल असे आश्वासन दिले.तसेच भूम नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ४६ कोटी ८४ लक्ष रुपयांचा निधीही लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न लवकर सोडविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबतही डॉ.सावंत यांनी मुख्याधिकारी यांना निर्देशित केले.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे म्हणत सोनारी व तेरणा हे दोन कारखाने पुन्हा सुरू करून येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आधार मिळाल्याचे ते म्हणाले.
तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूम – वारे,वडगाव – कासारी व भोगलगाव- साकत या रस्त्याच्या १४ कोटींच्या कामांचे,गोलाई चौक ते एमआयडीसी सिमेंट काँक्रीट व डांबरीकरण रस्त्याच्या १३ कोटी ८० लाख रुपयांचे,भूम ते इंदिरानगर पूल काँक्रीट रस्त्यासाठी ५ कोटी कामाचे, इंदिरानगर पूल ३ कोटी ८० लाख, इंदिरानगर पूल ते एमआयडीसी काँक्रीट डांबरीकरण रस्त्यासाठी ५ कोटी रुपयांच्या कामाचे आणि भूम शहरातील ११४ कोटी ६५ लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.याप्रसंगी आरोग्य विभागातील अधिकारी,कर्मचारी, आशा सेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.