धाराशिव : वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या कमानीशेजारी अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याला ऊत आला असल्यामुळे ते अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दि. ९ जानेवारी रोजी दिला आहे. दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी) येथील २५ वर्षापूर्वी सिमेंटमध्ये बांधलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमानी शेजारी काही गावगुंडांनी अतिक्रमण करून अवैध धंदे राजरोसपणे सुरू केले आहेत. त्यांच्यावर पोलिसांचा कसल्याच प्रकारचा धाक नाही, त्याचबरोबर ते उर्मटपणे सर्वसामान्यांनी कायद्याची भीती दाखविली तर पोलिसांना आम्ही घाबरत नसल्याचे दारू, मटका आदी अवैध धंदे करणारे अरेरावीची भाषा वापरत आहेत.
महापुरुषांच्या कमानीजवळ कोणाचीही जागा नसताना पत्र्याचे शेड, टपरी मारून अपमान या उद्देशाने या शेडमध्ये दारू, मटका, जुगार आदींसह इतर अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. या कमानीजवळ पिण्याच्या पाण्याचा वॉल्व्ह बसविला आहे. या वॉल्व्हवरूनच या भागातील महिला पिण्याचे पाणी भरण्यासाठी जातात. मात्र त्या ठिकाणी हे उनाड प्रवृत्तीचे गावगुंड शिवराळ भाषेमध्ये शिवीगाळ करतात. त्यामुळे महिलांचाही एक प्रकारे अवमान होत आहे. याबाबत सरपंच, उपसरपंच यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. तसेच ग्रामसेवक व इतर सदस्यांना देखील याची तक्रार केली मात्र हे अतिक्रमण हटविण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही किंवा कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे महामानवाची कमान उध्दवस्त करण्याच्या प्रयत्नात गावकऱ्यांच्या दबावाला बळी पडून ग्रामसेवक बंचितावर अन्याय करण्याचे धोरण अवलंबीत आहेत. त्यामुळे या कमानीला धोका निर्माण झाला असून, येथील दलित बांधवांच्या जीवीतास देखील धोका होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ते अतिक्रमण हटविण्यासह संबंधित अवैध धंदेवाल्याविरूध्द तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवावा अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनावरती सुशील गाडे, शेषेराव गाडे, रमेश गाडे, किशोर गाडे, सर्जेराव गाडे, माणिक लोडगे, बाबासाहेब गाडे. अविनाश गाडे, रविंद्र गाडे, समाधान गाडे, किरण गाडे, रवि गाडे, सिध्दार्थ गाडे, धनंजय गाडे, शिवाजी गाडे, रणजित गाडे, रत्नदीप गाडे, रामेश्वर गाडे, तानाजी गाडे, छगन लांडगे, श्रीमंत गाडे, उमेश गाडे, सुब्राव पाडोळे, विलास गाडे, भगत गाडे, अजिनाथ गाडे, दशरथ खंडागळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.