तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु) येथे गुलाब मेहबूब शेख यांची गट नंबर 14अ व 14 ब असे असून 2013 मध्ये कोणतीही पूर्ण सूचना नोटीस न काढता जमीन कॅनॉल साठी संपादित केली व 7/12 मधुन 28 गुंठे क्षेत्र कमी करण्यात आले. मात्र 2013 पासून कोणताही मोबदला न देता हे क्षेत्र सातबारा वरून कमी करण्यात आले आहे. वास्तविकता पाहता कॅनल गेलेले नसून जमीन देखील संपादित केलेली नाही मात्र कागदोपत्री जमीन संपादित केली असून कोणत्याही प्रकारचे मोबदला दिलेला नाही. त्यामुळे मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. त्या ठिकाणी पेरणी केल्यानंतर त्याचा पीक विमा ही काढता आला नाही. मागील काळामध्ये नुकसान होऊनही त्या ठिकाणी 7/12 वर क्षेत्र नसल्याने नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे गुलाब शेख यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात माझी जमीन मौजे पिंपळा (बु), ता. तुळजापूर, जि.धाराशिव येथे आहे. सदरील जमीनीचा गट नं. 14 अ/14ब असा असून दोन्ही गटाचे एकूण क्षेत्र 4 एकर आहे. मी माझ्या खाजगी कामासाठी 7/12 काढला असता मला असे समजले की, दि.10/09/2013 रोजीच्या फेर नं.1088 नुसार माझी जमीन कॅनलसाठी संपादित केलेली होती व माझे 28 गुंठे क्षेत्र कमी करण्यात आलेले आहे. तसेच मी चौकशी केली असता असे दिसून आले की, मला तशी कोणतीही नोटीस आलेली नव्हती व माझ्या क्षेत्रातून कॅनल पण गेलेले नाही. तरी देखील माझे 7/12 वरील क्षेत्र कमी करण्यात आले आहे.
सदरील 7/12 वरील क्षेत्र कमी झालेबाबत चौकशी करण्यासाठी मी मा. तहसीलदार साहेबांना अर्ज केला होता व मा. तहसीलदार साहेबांना क्षेत्राचा पंचनामा करण्यास पण विनंती केली होती. परंतु माझ्या या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेता त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. म्हणून मी सन 2017 साली मा. उपजिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयात प्रकरण दाखल केले. परंतु मला तेथूनही काही न्याय मिळण्याची आशा वाटत नाही. कारण सन 2017 पासून आजतागायत तारीख वर तारीख देण्यात येत आहे. पण प्रकरण निकाली निघण्याचे काही संकेत दिसत नसल्यामुळे, आपणास सदरचे निवेदन करण्यास कारण ठरले. मी एक गरीब शेतकरी असून सद्याच्या ओल्या दुष्काळाचा फटका मला पण बसलेला आहे व त्याचे अनुदानसुध्दा मला मिळाले नाही. माझी परिस्थिती हालाकीची असल्या कारणाने मी
कोर्टात केस पण नाही लढवू शकत. तरी मा. जिल्हाधिकारी साहेबांनी माझ्या निवेदनाचा सहानुभूतीपुर्वक विचार करून योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा मला आमरण उपोषणाला बसण्याशिवाय गत्यंतर नाही. तरी मा.जिल्हाधिकारी साहेबांना विनंती की, सदरील प्रकरणाची दखल घेवून माझे जमीन गट नं.14अ/14ब ची पाहणी करण्याचे आदेश व्हावेत व माझे होणारे आर्थिक व मानसिक नुकसान टाळावे, ही नम्र विनंती. असे निवेदन गुलाब शेख यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.