धाराशिव दि.13 ऑक्टोबर (प्रतिनिधी) मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या नियम 2025 नुसार आज धाराशिव येथील जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृह येथे जिल्हा परिषदेचे निवडणूक विभागनिहाय आरक्षण सोडत चिठ्ठ्या टाकून आयोजित सभेत निश्चित करण्यात आले.सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.काळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
धाराशिव जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी एकूण 55 निवडणूक विभाग आहेत. त्यापैकी 50 टक्के म्हणजे 28 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित आहेत.यामध्ये अनुसूचित जातीच्या सदस्यांची संख्या 9 असून त्यापैकी 5 जागा ह्या महिला सदस्यांसाठी आरक्षित आहे.अनुसूचित जमातीसाठी 1,नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 14 जागा असून त्यापैकी 7 महिलांसाठी आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 31 जागा असून त्यापैकी 16 जागा ह्या स्त्री सदस्यांसाठी राखीव आहे.
आजच्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी गटांच्या आरक्षण सोडत सभेत धाराशिव जिल्हा परिषदेच्या सर्व 55 निवडणूक विभागाच्या चिठ्ठ्या तयार करण्यात आल्या.अनुसूचित जातीकरिता 9 जागा आरक्षित असून त्यातील 5 जागा अनुसूचित जाती महिलांकरिता आरक्षित आहे. अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागांमध्ये सिंदफळ, काक्रंबा, शहापूर, वडगाव (सि), सांजा, डिकसळ,येरमाळा, खामसवाडी व सास्तुर या जागांचा समावेश आहे. उपस्थित विद्यार्थ्यांनी भरणीतून 5 चिठया काढल्या.यामध्ये वडगाव(सि),सिंदफळ, डिकसळ,येरमाळा, व सास्तूर हे निवडणूक विभाग अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित झाले आहे.
अनुसूचित जमातीसाठी ढोकी हा निवडणूक विभाग आरक्षित आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी वालवड, उपळा(मा), काटगाव, शिराढोण, काठी, येणेगुर, पळसप,येडशी, मोहा,लोणी,मंगरूळ,पाथरूड,तुरोरी व सुकटा या 14 निवडणूक विभागाचा समावेश असून नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी काटी, सुकटा,येणेगुर,वालवड, तुरोरी,मोहा आणि लोणी हे 7 निवडणूक विभाग आरक्षित झाले आहे.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 31 निवडणूक विभाग आरक्षित झाले आहे.त्यापैकी 16 विभाग हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. आष्टा, तेरखेडा, ईटकुर, नायगाव, पाडोळी, बेंबळी, शेळगाव,जवळा (नि), डोंजा , अणदूर, नंदगाव,कवठा,गुंजोटी, दाळींब आणि आलुर, ईट, पारगाव, पारा, कोंड, तेर, अंबेजवळगा, केशेगाव अनाळा, जळकोट, मंगरूळ, कानेगाव, माकणी, जेवळी, बलसूर व कदेर यांचा समावेश असून सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झालेले निवडणूक विभाग कोंड ,जळकोट, तेर मंगरूळ, ईट, बलसूर, कुन्हाळी, पारगाव, केशेगाव, माकणी, अनाळा,पारा,कानेगाव,अंबेजवळगा,कदेर व जेवळी या विभागाचा समावेश आहे.
यावेळी सोडतीने चिठ्ठया काढण्यासाठी जिल्हा परिषद मुलांची शाळा धाराशिव येथील शाबान मोबीन सय्यद, सय्यद जैन शाहीद, आरीप वाजीद सय्यद व अब्दुल्ला नवाब शेरीकर या शालेय विद्यार्थ्यांच्या हाताने भरणीतून आरक्षणाच्या चिठ्ठया काढण्यात आल्या.यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार बांधव उपस्थित होते.
*****