मुंबई : राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षणाची सोडत सोमवार, दि. ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
ही सोडत परिषद सभागृह, मंत्रालयाच्या ६व्या मजल्यावर पार पडणार असून, नगर विकास विभागामार्फत प्रक्रिया राबवली जाणार आहे. या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, भटक्या-विमुक्त, महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी नगराध्यक्ष पदांची विभागणी केली जाईल.
या सोडतीनंतर राज्यातील नगराध्यक्ष पदांचे आरक्षण स्पष्ट होणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचे राजकीय गणित ठरणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे राज्यभरातील सर्वच राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार व नागरिकांचे लक्ष लागले आहे.