छत्रपती संभाजीनगर, दि. १ () : “कमी वेळेत जास्त पैसा मिळवून देणारे संदेश किंवा सोशल मीडियावरील आकर्षक जाहिराती या फसवणुकीचे मुख्य साधन आहेत. यामागे ‘मोह’ हा घटक सर्वाधिक कार्यरत असतो. त्यामुळे कोणत्याही अनोळखी योजनेच्या आमिषाला बळी न पडणे, हेच सायबर फसवणूक टाळण्याचे मोठे शस्त्र आहे,” असे प्रतिपादन सायबर जागृती क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. धनंजय देशपांडे यांनी केले.
नोंदणी व मुद्रांक विभाग (रजिस्ट्री कार्यालय) यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित विशेष कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी सह जिल्हा निबंधक व्ही.डी. गांगुर्डे, आर.बी. मुळे, अशोक आटोळे उपस्थित होते. वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना याबाबत योग्य मार्गदर्शन होणे आवश्यक असल्याने ही कार्यशाळा घेण्यात आली.
या प्रसंगी नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक विजय भालेराव यांनी प्रास्ताविक केले. तर जळगावचे ॲड. सुनिल तारे यांनी नोंदणी व मुद्रांक विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. देशपांडे यांनी सांगितले की, अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल/मेसेजला प्रतिसाद देऊ नका तसेच अनोळखी लिंक क्लिक करू नये, कारण त्यामध्ये व्हायरस असू शकतो. फोटो आयडीसाठी मूळ आधार न देता ‘मास्क आधार’ वापरावा. आर्थिक फसवणूक बहुतेक वेळा शुक्रवारी दुपारी होते. कारण शनिवार-रविवारी बँका बंद असल्याने चोरट्यांना पैसे लपवण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे नागरिकांनी विशेष सावध राहावे.
कार्यशाळेला संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यातील नोंदणी व मुद्रांक कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुय्यम निबंधक ए.के. तुपे यांनी आभार मानले.