धाराशिव – श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 14वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दि 27 रोजी परिमल मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरण पार पडली. या सभेत सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. या सभेला संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अभय शहापूरक, यशदा मल्टिस्टेटचे चेअरमन सुधीर सस्ते, मोहेकर मल्टीस्टेटचे चेअरमन हनुमंत मडके, सहकार अधिकारी मधुकर जाधव, दिनेश कुलकर्णी, गणेश कामटे, संस्थेचे माजी अध्यक्ष व्यंकटेश कोरे, संचालक सतीश सोमाणी, सहकार क्षेत्रातील तज्ञ संदीप पाटील, संचालक ॲड.सचिन मिनियार, चार्टर अकाउंटंट एकनाथ धर्माधिकारी, दीपक भागभाते, मल्टीस्टेटचे सीईओ राजकुमार जाधव, अरविंद गोरे जिल्हा पतसंस्थेचे देविदास कुलकर्णी, योगेश कुलकर्णी सिद्धिविनायक कारखान्याचे संचालक प्रतिक देवळे, श्रावणी पतसंस्थेचे दाजी आप्पा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या यशस्वी वाटचालीबाबत मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले, 14 वर्षांच्या कालावधीत श्रीसिद्धिविनायक परिवारातील या संस्थेने 50 हजार सभासदांचा टप्पा गाठला असल्याचे सांगितले तसेच 250 कोटींच्या ठेवी आणि 133 कोटींचे कर्जवाटप करत संस्थेने 350 कोटींचा व्यवसाय उभारला आहे. धाराशिव जिल्हा संस्थेचे जाळे विस्तारले असून, लोकांचा विश्वास हेच खरे भांडवल असल्याचे सांगितले याबरोबरच सहकार क्षेत्रातील टप्प्यांबाबत ते म्हणाले, पहिली तीन वर्षे, त्यानंतरची पाच वर्षे आणि सात वर्षांचा टप्पा कोणत्याही व्यवसायासाठी निर्णायक ठरतो. दहा वर्षे सातत्याने यश मिळाले तर संस्था स्थिर होते, तर पंधरा वर्षांनंतर नवीन व्यवसाय उभारण्याची ताकद निर्माण होते. चार वर्षांपूर्वी 20 हजार सभासद होते, आता ही संख्या दुपटीहून अधिक वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच श्रीसिद्धिविनायक परिवारासोबत 750 ते 800 कर्मचाऱ्यांना रोजगार आणि सभासदांना 23 कोटींचा व्याज परतावा दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी डॉ.अभय शहापूरकर यांनी पूरग्रस्तांबद्दल सहानुभूती व्यक्त करत श्रीसिद्धिविनायक परिवार गुळ कारखाना आणि बँकेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहे. सामान्य माणसाला आधार मिळत असल्याचेच सांगितले तर संदीप पाटील यांनी संस्थेची आर्थिक स्थिती अधोरेखित करताना म्हटले, 99.70 टक्के ठेवी मागणीप्रमाणे तत्काळ परत करण्याची आमची क्षमता असल्याचे म्हटले. दरम्यान यशदाचे चेअरमन सुधीर सस्ते यांनी श्री सिद्धिविनायक परिवाराबद्दल गौरवोद्गार काढत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बँकेच्या धोरणांत शेतकऱ्यांना दिलासा देणारे बदल करण्याचा प्रयत्न व्हावा असे सांगितले. तर संस्था करत असलेल्या कार्याचे कौतुकही केले. यावेळी सभेत सभासदांसाठी 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक देवळे यांनी केले, तर गजानन पाटील यांनी आभार मानले.