धाराशिव :
परंडा तालुक्यातील पुरपरिस्थितीची जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आज (दि. २६) सर्व विभागांसह सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी बाधित गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
वडनेर गावातील पुरग्रस्त ३४ नागरिकांना प्रत्येकी ५,००० रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. रुई येथील बाधित लोकांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. तसेच वागेगव्हाण गावातील नुकसानीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
याशिवाय तुळजाभवानी मंदिराकडून प्राप्त झालेल्या साड्यांचे वाटपही पुरग्रस्त कुटुंबांना करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, पीडितांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.